कोरोना विरोधात लढाई जिंकलेला 'योद्धा'

ऑक्सिजन पातळी एवढी कमी झाली की डॉक्टर्सनी अवघ्या काही तासांचा अवधी दिला...

Updated: Dec 7, 2021, 08:21 PM IST
कोरोना विरोधात लढाई जिंकलेला 'योद्धा' title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : तब्बल 9 महिन्याच्या कालावधीनंतर माझा मित्र नागपूरहून परत आला. या दरम्यान त्याला कोरोना झाला असल्याची माहिती होती. त्या दरम्यान बोलणे ही झालं होतं, सगळे व्यवस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं. सातत्याने कॉल करायला नको म्हणून मी ही जास्त बोललो नाही. तो परत आल्यानंतर सोसायटीमधल्या मित्रांच्या ग्रुपने त्याला भेटायला जायचं ठरवलं. ठरल्या प्रमाणे गेलो. 

तब्बल ९ महिन्याने त्याला पहिल्यानंतर काळजाचा ठोका चुकला. खूप देखणा नसला तरी प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या साईनाथकडे पाहताना प्रचंड वेदना झाल्या. तो सध्या जसा दिसतो तो खूप चांगला असल्याचं त्याच्या पत्नीने सांगितले. त्यानंतर त्यांनी कोरोनाच्या लढ्याची कहाणी सांगायला सुरुवात केली आणि मी थक्कच झालो. 

कोरोनाचा तो अवघड काळ
कोरोनाच्या या दीड- दोन वर्षांच्या काळात अनके जवळचे गेलेले पाहिले. पत्रकारितेत असल्याने नागरिकांचे होणारे प्रचंड हाल पहिले. करता पुरुष घरातून गेल्यानंतर उद्वस्त झालेली कुटुंब, आई वडील दोन्ही कोरोनामुळे गेल्यामुळे अनाथ झालेली चिमुकली मुलं, तो ऍम्बुलन्सचा कानात घोंगावणारा आवाज, ऑक्सिजनसाठी धडपडणारी ती माणसे सगळे पाहिलं, हतबल झालो, उदास झालो, प्रसंगी भावना अनावर झाल्या. 

पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण
ते दिवस आता आठवू ही वाटत नाही. पण म्हणतात ना काही गोष्टी परत फिरून येतात. पिंपरी चिंचवड मध्ये आफ्रिकेतील नवीन व्हेरियन्ट असलेल्या ओमायक्रॉनचे ६ रुग्ण आढळले आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडकर भीतीने ग्रासले. राज्यातले ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याने शहरात तिसरी लाट तर येणार नाही ना अशी भीती निर्माण झाली आणि या भीतीच्या वातावरणात साईनाथच्या कोरोना विरोधातल्या लढाईची आठवण झाली. ती याच साठी की कोरोना ला कुणी हलक्यात घेऊ नये म्हणून. 

साईनाथला कोरोनाने गाठलं
एप्रिल महिन्याच्या आस पास काही घरगुती कार्यक्रमासाठी साईनाथ आणि कुटुंब नागपूरला गेले. राज्यात त्या वेळी कोरोनाचा सर्वाधिक कहर सुरु होता. त्यामुळे त्याचा निर्णय चुकला होता खरा आणि ते सिद्ध ही झालं. काही दिवसातच त्याला कोरोनाने गाठलं आणि पाहता पाहता तो मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला. 

शुगर असल्याने कोरोना आणखी बळावला. ऑक्सिजन पातळी एवढी कमी झाली की डॉक्टर्सनी अवघ्या काही तासांचा अवधी दिला. आय सी यु मध्ये असताना केवळ जगायचे या उद्देशाने तो लढत राहिला. कसलीही भीती न बाळगता शक्य तेवढे खुश राहून मानसिक संतुलन ढळू न देता तो लढत राहिला. 

याच उपचारादरम्यान ऑक्सिजन लावताना काही तरी चूक झाली आणि साईनाथच्या नाकावर एवढी मोठी जखम झाली की त्याच्या वेदना वेगळ्याच. कमालीची प्रतिकूल परिस्तिथी असताना डॉक्टरांचे प्रयत्न त्याची इच्छाशक्ती यामुळे तो कोरोना मुक्त झाला. पण एवढ्यावर लढाई थांबली तर कसे. नंतर पोस्ट कोविड इन्फेक्शन मुळे त्याला पुन्हा आय सी यु मध्ये दाखल करावं लागलं. 

हा कालावधी एवढा मोठा होता की त्यात ही डॉक्टर्सने साईनाथच्या कुटुंबियांना दोनदा त्याची जगण्याची शाश्वती नसल्याचं सांगितलं. 65-70 किलो वजन असलेल्या साईनाथचं या दरम्यान वजन 45 किलोच्या आसपास खाली घसरलं. हालचाल नसल्यानं पाय जमिनीवर ठेवणंही अवघड झालं. 

साईनाथच्या लढ्याला सलाम
रेमडीसीव्हरची घेतलेली सहा इंजेक्शन त्यानंतर रक्तात झालेले क्लॉटिंग, त्या साठीचे उपचार याचा शरीरावर प्रचंड विपरीत परिणाम झाला. पण त्याने जिद्द सोडली नाही. चार पावलं न चालू शकणारा साईनाथ आज अर्धा तास भर चालतोय. वजन ही 60 च्या पुढे आलंय. त्याचे आजारपणातले फोटो आणि आताचे फोटो पाहिल्यानंतर त्याने काय लढाई दिली याची कल्पना सहजच येईल. साईनाथ सारख्या अनेकांनी कोरोनावर विजय मिळवलाय. अशा या जिगरबाज योध्यांना सलाम. 

गाफील राहू नका
साईनाथच्या लढ्याची आठवण येण्याचे कारण केवळ या साठीच की आता पुन्हा ओमायक्रोनचे संकट आलंय. या काळात सर्वांनीच जबाबदारीने वागण्याची गरज आहे. घाबरण्याची गरज नसली तरी गाफील राहणे चांगलेच त्रासदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरात गंभीर परिस्तिथी निर्माण होऊ नये अशी अपेक्षा असेल तर कोरोना नियम पाळा आणि संकट टाळा हीच काय ती अपेक्षा.