मिलिंद हांडे, झी मीडिया, वर्धा : सतत आजारी पडत असल्याने अमरावती इथला एक युवक आर्वीच्या तंत्रिकाकडे गेला होता. मानसिक आजार असलेल्या तरुणावर उपचार करत असताना तांत्रिकाने त्या तरुणाचा गळा आवळला. यात या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
अमरावतीमध्ये राहाणारा एक तरुण वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी शहरात उपचारासाठी आला होता. मानसिक आजारावर हमखास उपचार होतील असा दावा या तांत्रिकाने केला होता. याची माहिती अमरावतीतल्या रितीक सोंनकुसरे या तरुणाच्या कानावर आली. रितीक मानसिक आजाराने त्रस्त होता.
मानसिक आजारावर डॉक्टरकडे उपचार करण्याऐवजी हा तरुण वर्ध्यातल्या तांत्रिकाकडे आला. आर्वीच्या विठ्ठल वॉर्डात राहणारे अब्दुल रहिम अब्दुल मजीद, अब्दुल जुनैद, आणि अब्दुल जमीर हे तिघं आपण तांत्रिक असल्याचा दावा करत होते. रितीकने या तिघाकंडे उपचार सुरु केले. पण उपचाराच्या नावाखाली तांत्रिकांकडून अक्षरश: अघोरी प्रकार सुरु झाले.
उपचाराच्या नावाखाली एका तांत्रिकाने रितीकचा चक्क गळा आवळला. यातच रितीकचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे रितीकचा मृत्यू झाल्यानंतर याची माहिती पोलिसांना न देता तांत्रिकांनी रितीकचा मृतदेह थेट अमरावतीत त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवून दिला. पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिनही आरोपींना अटक केली आहे.