चक्रीवादळग्रस्तांसाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून महत्वाच्या उपाययोजना

मंत्री विजय वडेट्टीवार यांचा रायगड आणि रत्नागिरी दौरा

Updated: Jun 8, 2020, 08:10 PM IST
चक्रीवादळग्रस्तांसाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून महत्वाच्या उपाययोजना title=

प्रणव पोळेकर, रत्नागिरी :   निसर्ग चक्रीवादळाने अतोनात नुकसान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी चक्रीवादळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती दिली. चक्रीवादळग्रस्तांना रोख मदतीसह वीज, पाणी, अन्नधान्य पुरवठा तातडीने केला जाईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना आर्थिक मदत तातडीने दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. आपत्तीनंतर अनेक गावांचा पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वीजपुरवठाही खंडित आहे. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यासाठी नवे खांब मागवावे लागणार आहेत. ४००० खांबांची तातडीने गरज असून २५०० खांब नागपूरहून मागवले असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी मंडणगड येथे पत्रकार परिषदेत दिली.

लोकांची घरेदारे उद्धवस्त झाली आहेत. संसारही उघड्यावर आले आहेत. अन्नधान्याची नासधूस झाली आहे. त्यामुळे आपत्तीग्रस्तांना ५ किलो तांदूळ आणि एक किलो डाळ तातडीने देण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच पुढच्या दोन दिवसांत गावामध्ये कम्युनिटी किचनद्वारे जेवणाची व्यवस्था करणार असल्याची माहितीदेखिल वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चक्रीवादळात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी ४३०० रुपये देण्यात येणार आहेत आणि आठ दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात असेल तर त्याला १२ हजार रुपये मदत दिली जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

चक्रीवादळात नुकसान झालेल्या लोकांना तातडीने ही मदत देणार

  1. अनेक कुटुंबांना रोख मदत करणार
  2. तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर वापरणार
  3. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ४००० पोलची गरज. २५०० पोल नागपूरहून मागवले
  4. दोन दिवसांत गावात कम्युनिटी किचन सुरु करणार
  5. प्रत्येक कुटुंबाला धान्य देणार. ५ किलो तांदूळ आणि १ किलो डाळ देणार
  6. चक्रीवादळाच्या आपत्तीत जखमी झालेल्या व्यक्तिला प्रत्येकी ४३०० रुपये देणार. आठवडाभर रुग्णालयात असेल तर १२ हजार रुपये देणार
  7. मदत वाटपात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही
  8. सरकार आपत्तीग्रस्त लोकांच्या पाठिशी उभे राहील

 

वडेट्टीवार यांनी रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि त्यानंतर या मदतीबाबत माहिती दिली. या दौऱ्यात त्यांच्याबरोबर आमदार भाई जगताप, आमदार योगेश कदम हेदेखिल सहभागी झाले होते.