APMC Elections News : राज्यात आज 147 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी आज आणि 30 तारखेला निवडणूक होणार आहे. 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. सर्वात चुरशीच्या मानली जाणारी मालेगाव बाजार समिती निवडणुकीत, 18 जागांसाठी 4 ठिकाणी मतदान होतंय. सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. पालकमंत्री दादा भुसे विरुद्ध महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे अशी अटीतटीची लढत असणार आहे. या निवडणुकीच अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्यांसाठी आज सार्वत्रिक मतदान होत आहे. मालेगाव आणि नांदगाव बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी आहे. मालेगाव बाजार समितीत पालकमंत्री दादा भुसे आणि महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनेलमध्ये चुरशीची लढत आहे. तर नांदगाव बाजारसमितीत विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे पाच माजी आमदार एकवटलेत. ही लढत लक्षवेधी मानली जातेय. देवळात यापूर्वीच 8 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर 10 जागांसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी पॅनल मध्ये मोठी चुरस पाहायला मिळणारे. पंचवार्षिक संचालक मंडळाच्या 14 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मविआ विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. पुण्यातील जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीने पक्षातून हकालपट्टी केल्यानं अनेकजण इतर पक्षांतून निवडणूक लढवतायत.. मात्र फक्त आपल्यावरच कारवाई का असा प्रश्न दांगट यांनी उपस्थित केलाय.
रायगड जिल्ह्यातील 9 पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, त्यांच्यावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाय. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या 99 पैकी 88 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. जिल्ह्यात उर्वरित चार बाजार समिती निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. यवतमाळमध्ये आज 7 APMC साठी मतदान होणार आहे. तर उर्वरित 8 APMCसाठी 30 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत 637 उमेदवार रिंगणात आहेत.
अमरावती जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची 2 टप्प्यांत निवडणूका होणार आहे. अमरावती, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, अंजनगाव सुर्जी आणि मोर्शी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान होईल.
धुळे जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडत असून, मतदानासाठी आवश्यक साहित्याचं वाटप पूर्ण झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्यात. आज धुळे आणि दोंडाईचासाठी तर रविवारी शिरपूर आणि साक्री बाजार समितीसाठी मतदान होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 6 बाजार समित्यांच्या निवडणुका आहेत. यापैकी 3 बिनविरोध झाल्यात. तर नंदुरबार, शहादा आणि नवापूर बाजारसमितीच्या मतदान प्रक्रियेसाठी साहित्य वाटप करण्यात आलंय. 108 जागांसाठी 10 हजारांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.