Maharashtra Weather Forecast Today: अरे बापरे! मुंबई, कोकणासह देशभरात आजपासून हवामानाचे रंग पाहून व्हाल हैराण

Maharashtra Weather Forecast Today: मुंबईसह महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवमान नेमकं कसं असेल याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे फिरण्यासाठी जाणार असाल तरीही हवामानाचा अंदाज पाहूनच घ्या, कारण नंतर पश्चाताप नको   

सायली पाटील | Updated: Apr 28, 2023, 07:39 AM IST
Maharashtra Weather Forecast Today: अरे बापरे! मुंबई, कोकणासह देशभरात आजपासून हवामानाचे रंग पाहून व्हाल हैराण title=
maharashtra weather Forecast Mumbai Unseasonal Rain predictions latest update

Maharashtra Weather : एप्रिल महिना संपून आता मे महिना उजाडण्याची वेळ झाली. काही दिवसांनी यंदाच्या हंगामातील मान्सूनची वाटचालही सुरु होईल. पण, इथून अवकाळी काही काढता पाय घेताना दिसत नाहीये. मागील काही दिवसांपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागाला झोडपणाऱ्या अवकाळी पावसानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. पावसाच्या या हजेरीमुळं वातावरणात गारवा जाणवणार आहे, त्याशिवाय तापमानातही काही अंशांची घट नोंदवली जाऊ शकते. त्यामुळं मौसम मस्ताना, उन्हाळा असताना? असाच प्रश्न तुम्हालाही पडेल. 

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यभरावर अवकाळी पावसाचं संकट कायम असणार आहे. शहरावर संपूर्ण दिवसभर मळभ पाहायला मिळणार आहे. शिवाय विदर्भाला गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्याला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, पुणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं मे महिन्याची सुरुवातही पावसानंच होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. 

अवकाळीचा मारा सुरूच 

लातूर जिल्ह्यातील उदगीर, औसा, शिरूर अनंतपाळ भागात अवकाळी गुरुवारी पावसाने हजेरी लावली. तिथे जळगावातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. अकोला जिल्ह्यातल्या पातूर इथे दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली. ज्यामुळं नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अवकाळी आणि गारपीटीच्या या संकटामुळं शेतकरी मात्र हवालदिल झाला असून, आता या नुकसानभरपाईसाठी शासकीय मदतीकडे डोळे लावून आहे. 

पर्यटनाच्या निमित्तानं घराबाहेर पडताय? आताच पाहा देशातील हवामानाचा अंदाज 

पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळं उत्तर भारतापासून बहुतांश देशावर पुन्हा एकदा पावसाचे ढग आले आहेत. 28 एप्रिलपासून तापमानात घट होणार असल्याचाही अंदाज सध्या वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये तर तापमान 7 अंशांनी कमी होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. 

परिणामस्वरुप कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी, केरळ या भागांना पावसाचा तडाखा बसेल. जम्मू काश्मीर आणि हिमाचलच्या काही भागातही पावसाची हजेरी असेल. तर, अती उंचीवर असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टीही होऊ शकते. उत्तराखंडमध्येही परिस्थिती काहीशी अशीच असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं सध्या पर्यचनाचा काळ पाहता तुम्हीही घराबाहेर पडणार असाल, तर थंडी, ऊन, पाऊस अशा सर्वच ऋतूंची तयारी करून निघा.