VIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले

Viral Video : नोएडात पार पडलेला शाही विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. या हायप्रोफाईल लग्नात मुलाला मर्सिडीज आणि फॉर्च्युनर कार, 1.25 किलो सोने, 7 किलो चांदी ते सुमारे 1.5 कोटी रुपये रोख असा हुंडा देण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आकाश नेटके | Updated: Feb 16, 2024, 01:38 PM IST
VIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले  title=

Viral Video : देशात हुंडाप्रथा थांबवण्यासाठी सरकारने कडक कायदा केलेला असला तरी त्याचा धाक लोकांना राहिलेला दिसत नाही. अद्यापही अनेक ठिकाणी हुंडाप्रथा सर्रासपणे सुरु आहे. हुंडा प्रथा संपवण्यासाठी देशात अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. मात्र आजही ही प्रथा समाजातून गेलेली नाही. अनेकजण त्याचे उघडपणे समर्थन करत असल्याचेही दिसत आहे. या प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल केले जात आहेत. याच हुंडा प्रथेशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या लग्नांच्या प्रदर्शनात, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. काहींनी आपलेही लग्न असंच व्हावं असे म्हटलं आहे. तर काहींनी याचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. हा व्हिडीओ एका लग्नातला असून त्यामध्ये दोन कुटुंबे काही वस्तूंची देवाणघेवाण करत आहे. 

व्हिडीओमध्ये वधूचे कुटुंब वराकडच्या लोकांना भरपूर पैसे, वाहने आणि वस्तू देताना दिसत आहे. एवढेच नाही तर वधूपक्षातील एक व्यक्ती उभी राहून हुंड्यात दिलेल्या वस्तूंची यादी वाचताना दिसत आहे. या वस्तूंच्या यादीमध्ये, ती वाचणारी व्यक्ती मर्सिडीज ई-क्लास कार, टोयोटा फॉर्च्युनर, 1.25 किलोपेक्षा जास्त सोने आणि 7 किलो चांदी दिले जाणार असल्याचे सांगत आहे. एवढेच नाही तर वराच्या बाजूने 1 कोटी रुपये रोख देखील देण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमात सांगण्यात आले.

4 फेब्रुवारी रोजी हा लग्नसोहळा पार पडल्याचे म्हटलं जात आहे. या लग्नात वराला एक मर्सिडीज आणि फॉर्च्युनर कार सोबतच मोठी रोख रक्कम आणि दागिनेही मिळाले. तर मुलीकडच्यांना भेट म्हणून एक कोटी रुपये रोख देण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फॉर्च्युनर आणि मर्सिडीज गाड्या लग्नाच्या मंडपात दिसत आहेत. मुलीच्या लग्नात वडिलांनी त्यांच्या सुनेसह कन्यादानासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले. मुलीच्या लग्नासाठी एक कोटी एक हजार 100 रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर शगुनमध्ये 21 लाखांची रोकड सुपूर्द करण्यात आली. मुलीच्या वडिलांनी जावयाला फ्लॅट देखील दिल्याचे म्हटलं जात आहे. या लग्नात 15 कोटींहून अधिक खर्च झाल्याची चर्चा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार सुरु असताना तिथे उपस्थित असलेले कोणीही काहीच बोलत नाही. तसेच पोलिसांनी लग्नाची माहिती नाकारली आहे. या विवाहाविरोधात कोणीही तक्रार किंवा तक्रार दिली नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@gujjar_boy_page__)

झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही. मात्र व्हिडिओवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक अशा प्रथेवर चिंता व्यक्त करत आहेत तर काही पोलिस कारवाईची मागणी केली आहे. अनेकांनी याला संपत्तीचे दिखाऊ प्रदर्शन म्हणून त्या लोकांचा तिरस्कार व्यक्त केला. तर काहींनी नवऱ्या मुलाला वराच्या वेशातील भिकारी असं म्हटलं आहे. हे लग्न नसून व्यवसाय आहे, असेही एका युजरने म्हटले आहे. आणखी एका युजरने, पोलिस कारवाई का करत नाहीत? माझ्या माहितीनुसार हुंडा घेणे आणि देणे हा गुन्हा आहे,' अशी कमेंट केली आहे.