अमर काणे नागपूर : राज्याच्या उपराजधानीत चाफले नगर येथील एका घरावर असलेल्या सीसीटीव्हीतील चित्रित झालेलं दृष्य हे सध्या नागपूरमधील चर्चेचा विषय बनला आहे. या सीसीटीव्हीत दिसत असलेली आकृती भूत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. शताब्दी चौकाजवळील चाफले लेआऊट येथे राजू मेश्राम यांनी आपल्या घरी सीसीटीव्ही लावले आहे. 19 जुलैला रात्री 12 वाजून 36 मिनिटांनंतरचं त्याच्या घरातील सीसीटीव्हीत असे काही रेकॉर्ड झाले, ज्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. चाफलेनगर येथील एका गल्लीत घरासमोर उभ्या असलेल्या ऑटोजवळ एक आकृती किंवा एखादी प्रतिमा ऑटोच्या टपाजवळून पुढे जाताना त्यांना दिसली आहे. नंतर ती जमिनीवर थोडी पुढे जात अचानक गायब होते. असं या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालं आहे.
अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चाफले लेआऊटमध्ये कथित भुत सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्याच्या या चर्चेमुळे परिसरात लोकं घाबले आहेत, ज्यामुळे सर्वत्र शांतता आहे.
खरेतर लेआऊटमध्ये राहणाऱ्या राजू मेश्राम यांच्या घरासमोर उभा असणा-या त्यांच्या ऑटोवर काही दिवसांपूर्वी गुंडांनी हल्ला केला होता. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने मेश्राम कुटुंबियांनी घराबाहेर सीसीटीव्ही लावला.
19 जुलैला मध्यरात्रीनंतर घरासमोर जोरात आवाज आला. घरावर पुन्हा हल्ला झाला या भीतीने राजू आणि त्यांच्ये कुटुंबीय जागे झाले. मात्र, घराबाहेर निघून धोका पत्करण्याऐवजी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने घराबाहेर काये झाले हे तपासले. तेव्हा त्यांना 12 वाजून 36 मिनिटांनतर एक प्रतिमा ऑटोच्या टपाजवळ दिसली, नंतर ती पुढे जाऊ गायब झाल्याचं त्यांना पाहिले ज्याचा त्यांना धक्का बसला.
आधीच गुंडांच्या हल्ल्याने हे लोकं घाबरले होते त्यानंतर आता भूताच्या या प्रकाराने मेश्राम कुटुंब अजून धास्तावले आहेत. त्यांनी दुसऱ्या दिवशी परिसरातल्या नागरिकांना हे फुटेज दाखविले. त्यानंतर सर्वत्र भूताची चर्चा सुरु झाली.
काही वर्षांपूर्वी एका 12 वर्षीय मुलीने विहिरीत आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे भुताच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. ज्यामुळे परिसर सामसुम दिसू लागला. लोकं भितीने आपापल्या घरात बंदिस्त झाले. दरम्यान पोलिसांपर्यंत ही बाब पोहचली.
त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या परिसरात जाऊन घटनेची तपासणी करत ,संपूर्ण शहानिशा केली. त्यानंतर त्यांनी ही घटना निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर अंनिस ने या परिसरात भूत असल्याचे सिद्ध करणाऱ्याला २५ लाखांचे रोख बक्षिस जाहीर केलं आहे.
दरम्यान याप्रकरणी झी 24तासशी सीसीटीव्ही एक्स्पर्टने सांगितले की, "सीसीटीव्हीत लेन्स, तांत्रिक बाबींमुळे अशी दृष्य येत असतात, खास करून रात्रीला अशी काही दृष्य दिसून घोस्ट इमेजचा भ्रम लोकांच्या मनात निर्माण होतात."
अंनिस आणि सीसीटीव्ही तज्ज्ञांनी भूतनसल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी अफवांचा बाजार मात्र जोमात आहे.