प्रवीण तांडेरकर,झी मीडिया
भंडाराः मांडव सजला, बँड बाजासह वऱ्हाडी आले, लग्न घटीका समीप आली आणि भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरात गावकऱ्यांची सुरु झाली लगीनघाई. हा लग्न सोहळा खास असल्याने या सोहळ्याला खास पाहुण्याला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि हा पाहुणा म्हणजे वरुण राजा आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊया. (Bhandara Doll Marriage)
चांगला पाऊस पडावा यासाठी काही ठिकाणी बेडका-बेडकीचं लग्न लावलं जाण्याची प्रथा आहे. पण आता पावसाला आमंत्रण देण्यासाठी लाखांदूर येथे चक्क बाहुला-बाहुलीचे लग्न लावण्यात आले आहे. या लग्नासाठी अख्खं गाव गोळा झालं आहे. तर, सर्वांच्या साक्षीने बाहुवा-बाहुलीची लग्नगाठ बांधली आहे.
वरुण राजाला पावसासाठी साकडे घालून पावसाची प्रतीक्षा संपवावी म्हणून बाहुला बाहुलीचे स्वयंवर आयोजित करण्यात आले. गावकऱ्यांनी लग्न मंडपही बांधला. हिरव्यागार झाडांच्या फांद्यानी छान मांडव सजवला होता. सायंकाळ झाली अन् नवरदेव रुपी बाहुला लग्न मंडपात येण्यासाठी जनवशावरून निघाला त्याच्या सोबत एक दोन नव्हे तर चक्क शंभराच्या वर वऱ्हाडी वरातीत सामील झाले. चिमुकली मुलं ढोल-ताशाच्या गजरात वरातीत वऱ्हाडी बेधुंद नाचू लागले.
वाजत गाजत वरात लग्न मंडपात पोहचली अन् गावतल्या बायका नटून थटून तयार नवरीच्या रुपात तयार करण्यात आलेल्या बाहुलीला घेऊन आल्या. नवरीरुपी बाहुली मंडपात आसनस्थ झाली. चक्क पाच मंगलाष्टके झाल्या आणि बाहुला बाहुलीचा लग्न सोहळा पार पडला. लग्न संपन्न होताच वऱ्हाड्यांसाठी स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आली होती. पाहुण्यांसाठी लग्नाची पंगतदेखील बसवली होती त्यावर पाहुण्यांनी मनसोक्त ताव मारला. या अनोख्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे.
भंडाऱ्यात पावसाने हजेरी जरी लावली असली तरी लाखांदूर तालुका अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळं लाखांदूरवासीयांनी बाहुला बाहुलीचे लग्न लावून वरूण राजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, जोरदार पाऊस पडून बळीराजा सुखावला पाहिजे अशी विनवणी केली. आता वरूण राजा बरसणार का याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला असून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. मुंबई- पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 4-5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर पुण्यासाली यलो अलर्ट जारी केला आहे. तसंच, घाट भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण घाटमाथा परिसरात आणि या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.