रत्नागिरी : राजापूरमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरीसाठी जमीन मोजणीच्या कामाला आज सलग दुसऱ्या दिवशी विरोध केलाय. पोलिसांकडून शेतकरी आणि जमीन मालकांची धरपकड सुरू झालीय.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणासाठीची मोजणी आज पुन्हा एकदा बंद पाडण्यात आली. दुसऱ्या दिवशी मोजणीला ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. शांततेच्या मार्गाने ग्रामस्थांना मोजणी बंद पाडली आहे. कुटुंबासह ग्रामस्थ मोजणीच्या ठिकाणी दाखल झालेत. रिफायनरी प्रकल्पच नको असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय.
जैतापूरचा विरोध थंड होत नाही तोवर राजापूर तालुक्यातील नाणार येथे ऑईल रिफायनरीच्या विरोधात हजारोंच्या संख्येने जनता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलीय...ऑईल रिफायनरीच्या विरोधात कोकण पेटू लागलंय...काहीही झालं तरी जमिनी या प्रकल्पाला देणार नाही असा ठाम निर्धार शेतकरी व्यक्त करत आहेत. जमीन मालकांनी मोजणीची प्रक्रिया शांततेच्या मार्गाने बंद पाडली...राजापूर तालुक्यातील दत्तवाडी, नाणार गाव, पाळेकरवाडी आणि सागवे गावातील कात्रादेवी वाडी या ठिकाणीची जमीन मोजण्याचं काम सुरू केलंय. वडिलोपार्जीत शेतीवाडी सोडून इथले गावकरी जाण्यास तयार नाहीत.
तर दुसरीकडे जोपर्यंत सत्तर टक्के लोकांची सम्मती मिळत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होणार नाही असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. केंद्र शासनातर्फे इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी संयुक्तरित्या नवीन रिफायनरी उभारण्याचा मनसुबा आहे. त्यातून हंगामी साठ दशलक्ष टन कच्च्या तेलाचं शुद्धीकरण करण्यात येईल.
प्रकल्पासाठी नाणार गावात १४ हजार एकरात एक भाग आणि विजयदुर्ग परिसरात एक हजार एकरात दुसरा भाग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ४ ठिकाणी जिल्हा प्रशासन जमीन संपादित करणार आहे.