'भाजपा है तो मुन्कीन है'; तलाठी परीक्षेत 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळताच मोठा घोटाळा समोर

Talathi Paper Scam : तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाल्याने विरोधकांनीसुद्धा सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 8, 2024, 10:30 AM IST
'भाजपा है तो मुन्कीन है'; तलाठी परीक्षेत 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळताच मोठा घोटाळा समोर title=

Talathi Paper Scam : 5 जानेवारी रोजी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये  मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.तलाठी भरतीत टॉपर विद्यार्थिनीला 200 पैकी 214 मार्क मिळाले आहेत.याच विद्यार्थीनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये फक्त 54 मार्क पडले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये 14 दिवसाचा गॅप असताना हे कसं शक्य झालं असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित करत निकालावर आक्षेप घेतला आहे. या भरती परीक्षेत घोटाळा झाला असून, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.

या सगळ्या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा चौकशीची मागणी केली आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतेय हे स्पष्ट होत आहे. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. तलाठी भरती परीक्षेतल्या घोटाळ्याचे पुरावे विजय वडेट्टीवार यांनी सादर करावेत. पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी मोठी घोषणाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांची टीका

"200 गुणांच्या तलाठी परीक्षेत 214 मार्क पडणे म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे 48 पैकी 60 खासदार निवडून येण्यासारखे आहे. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून ‘भाजपा सरकार है तो मुन्कीन है’ असंच म्हणावं लागेल. तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या देखील #FIR दाखल झाल्या, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केलं. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी 25 लाखाहून अधिकची वसुली झाली. सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून जवळपास 1500 कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे. केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारने केलं आहे. राज्यात एकही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला, परंतु हे चोर-गद्दारांचं निकामी सरकार मात्र आपल्या सत्तेच्या मस्तीत गुंग आहे. पेपरफुटी विरोधात कडक कायदा करण्यासंदर्भात सरकार एवढं उदासीन का? याचं उत्तर आज मिळालं. सत्तेची एवढी मस्ती योग्य नाही हे सरकारमधील त्रिकुटाने लक्षात घ्यावं," असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.