पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत जाहीर, विजय वडेट्टीवार यांची घोषणा

मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत

Updated: Jul 26, 2021, 07:09 PM IST
पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत जाहीर, विजय वडेट्टीवार यांची घोषणा title=

सांगली : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीत ही माहिती दिली. राज्य सरकारकडून पूरबाधितांना ही पहिली आर्थिक मदत तातडीच्या रूपात केली जाणार आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत विजय वडेट्टीवार यांनी महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली. ज्या नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत सरकारने जाहीर केली आहे. तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजारांची मदत जाहीर केली आहे. 

याशिवाय पूर्णपणे घर पडलं असेल त्याला देखील मदत दिली जाणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे संपूर्ण पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटुंबास दिले जाईल. असं देखील विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.