मुंबई : स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा तलवार म्यान केल्याचं पुढं आलंय. शिवसेना - भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झालंय. शिवसेनेनं तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपही उरलेल्या तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार आहेत. नाशिक, कोकण आणि परभणी-हिंगोलीत पक्षाची जास्त ताकद असल्याचा दावा करत शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत... तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे....
तर दुसरीकडे मराठवाड्यातल्या एका जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीतील आघाडीत बिघाडी झालीय. लातूर-बीड-उस्मानाबादच्या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपमधून स्वगृही परतलेल्या रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर केली.
त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसनंही राज किशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे आता सर्वच ठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये राज्यातील सहा विधान परिषद मतदारसंघांमध्ये २० एप्रिलपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. नाशिकसह सिंधुदुर्ग, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील विधान परिषद मतदारसंघासाठी २१ मे २०१८ रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार असून आचारसंहिता लागू करण्यात आलीय.
अर्ज भरण्यासाठी ३ मेपर्यंत मुदत देण्यात आली असून, ४ मे रोजी अर्ज छाननी होणार आहे. ७ मे ही अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. २१ मे रोजी सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० या वेळेत मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार असून २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. २९ मेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहील.
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या ७८ जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २३ आमदार आहेत. तर त्यानंतर काँग्रेसचे १९, भाजप १८, शिवसेना ९, अपक्ष ६, लोकभारती १ आणि इतर २ असे आमदार आहेत.