काँग्रेसच्या 4 आमदारांची मतं फुटणार म्हणजे फुटणार.. निवडणुकीआधी काँग्रेस आमदाराने केलेला दावा 100 टक्के खरा ठरला

रातभर दिल की धडकने जारी रहती है, सोते नहीं है हम, जिम्मेदारी रहती है... असं म्हणत काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांनी मतदान केल्यानंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरोशायरी केली. 

वनिता कांबळे | Updated: Jul 12, 2024, 08:44 PM IST
काँग्रेसच्या 4 आमदारांची मतं फुटणार म्हणजे फुटणार.. निवडणुकीआधी काँग्रेस आमदाराने केलेला दावा 100 टक्के खरा ठरला  title=

Vidhan Parishad Election 2024: काँग्रेसच्या 4 आमदारांची मतं फुटणार म्हणजे फुटणारच असा दावा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी निवडणुकीआधी केला होता. कैलास गोरंट्याल यांचा हा दावा 100 टक्के खरा ठरला  आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटल्याचे दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत  दगा फटका टाळण्यासाठी सर्व पक्षांनी खबरदारी म्हणून आमदारांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये ठेवले होते. अखेर विधान परिषद निवडणुकीत फुटाफुट झाल्याचे दिसत आहेत. 

काँग्रेसचे 3 ते 4 आमदार फुटू शकतात असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला होता. आंध्र आणि नांदेड बॉर्डरसह टोपीवाला आमदार फुटण्याची वर्तवली शक्यता त्यांनी वर्तवली होती.  तर महाविकासआघाडीचे तीनही आमदार निवडून येतील असे भाकितही त्यांनी केले होते. 

महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केला होता. खोसकरांकडून दगाफटका होऊ शकतो असा नाव न घेता कैलास गोरंट्याल यांनी आरोप केला होता. 
कोणते आमदार फुटणार याची कैलास गोरंट्याल यांनी दिली होती हिंट

सुरुवातीला गोरंट्याल यांनी 'टोपीवाला' आमदार असा उल्लेख केला होता. सध्या विधानसभेत असलेले टोपीवाले आमदार म्हणजे राष्ट्रवादीचे झिरवळ, तसंच काँग्रेसचे शिरीष चौधरी आणि हिरामन खोसकर आहेत. या नावांचा विचार केल्यास हिरामन खोसकर यांचं नाव लगेच येतं. कारण त्यांनी अलिकडेच भुजबळांची भेट घेतली होती आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

गोरंट्याल यांनी दुसरा उल्लेख केला तो 'आंध्र आणि नांदेड बॉर्डरवरचे आमदार'... आंध्र आणि नांदेडच्या बॉर्डरवर काँग्रेस आमदाराचा मतदारसंघ येतो तो म्हणजे देगलूर. या मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आमदार आहेत. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे गोरंट्याल यांचा रोख अंतापूरकरांवरच असण्याची जास्त शक्यता आहे.

गोरंट्याल यांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा आमदार म्हणजे 'ज्यांचे वडील राष्ट्रवादीत आहेत'... लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्याकडे गोरंट्याल यांचा रोख दिसतोय. झिशान राष्ट्रवादीत जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय... केवळ आमदारकी रद्द होऊ नये म्हणून ते काँग्रेसमध्ये असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेसचे 7 आमदार फुटले?

कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसचे तीन ते चार आमदार फुटू शकतात अशी शक्यता वर्तवल्यानंतर  काँग्रेसनेही खबरदारी घतेली होती.  विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने व्हीप जारी केला होता. निवडणुकीत मात्र काँग्रेसची सात मते फुटल्याचे दिसत आहे. ठाकरेंची 17 मते आणि 5 मते काँग्रेसची अशी 22 मत नार्वेकरांना पडली आहेत. सातव यांना 25 मते म्हणजे  25+5 म्हणजे 30 एकूण बेरीज पाहिली असता 37 पैकी 30 मते महाविकास आघाडीला पडली आहेत.