Buldhana Rain : गेल्या चार ते पाच दिवसांपासून संपूर्ण राज्यासह पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्यामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे या पुराच्या पाण्याने अनेक भागांना वेढा दिला आहे. अशा परिस्थितीत अनेकांना वैद्यकीय सोई सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहे. दरम्यान मलकापूर तालुक्यातील काळेगाव येथील एका मायलेकराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूराची दाहक परिस्थिती दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पूर्णा नदीच्या पाण्यामुळे मलकापूर तालुक्यातील काळेगाव येथील विश्वगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून काळेगावचा संपर्क तुटला आहे. अशातच आपल्या लेकराला दवाखान्यात नेण्यासाठी एका आईने चक्क टायरच्या ट्यूबवर बसून प्रवास करत नदी पार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
काळेगाव येथे एका लहान बाळाला ताप आल्याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी त्याच्या आईने पूराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास केला आहे. मुलाला मलकापूर येथील रुग्णालयात जाण्यासाठी आईने बाळासह टायरच्या ट्यूबवर बसून नदी पार केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. पाऊस थांबल्यामुळे आणि पूरही ओसरळ्यामुळे प्रशासनाने या गावातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ बराच व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार त्यांच्या चमुसह गावात दाखल झाले. याठिकाणी एका बोटीसह प्रशासनाने आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कॅम्पची व्यवस्था केली आहे. मात्र गावकऱ्यांनी गावात कायमस्वरूपी आरोग्य सुविधा असल्यास पुढे केव्हाही ग्रामस्थांना आणि विशेष करून अशा मातांना आपला जीव धोक्यात घालून नदी पार करण्याची वेळ येणार नाही असे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या नव्हे तर कायम स्वरूपी उपाय योजना उपलब्ध करुन देण्याची विनंती ग्रामस्थांनी केली आहे.