'वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पात पैसे कोणी...,' राज ठाकरेंच्या संशयाने खळबळ

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नेमका फिस्कटला कुठे असा सवाल उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. 

Updated: Sep 19, 2022, 01:54 PM IST
'वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पात पैसे कोणी...,' राज ठाकरेंच्या संशयाने खळबळ title=

मुंबई : राज्यात येऊ घातलेला, मात्र आता गुजरातमध्ये उभारल्या जाणाऱ्या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प नेमका फिस्कटला कुठे असा सवाल उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. राज ठाकरे नागपुरात बोलत होते. 

राज ठाकरे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नागपूरात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्पावरून आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्रात खुप मोठ्या प्रमाणावर उद्योग येत असतात. त्यामुळे राजकीय नेत्यांना तो कुठे गेला काय याचा फरक पडत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. यासोबतचं औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी राजकीय नेत्यांना दिला. ़

फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्पाची डिल नेमकी फिस्कटली कुठे याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली आहे. यासह या प्रकल्पात कुणी पैसे मागितले का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान याआधी राज ठाकरे यांनी ट्विट करून या प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? संतप्त सवाल उपस्थित केला होता.  

महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला, हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी,अशी मागणी त्यांनी ट्विट करून केली होती.