यंदा पुरुषोत्तम करंडकास कोणीही पात्र नाही? स्पर्धेच्या अनपेक्षित निकालानं एकच खळबळ

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा दर्जा कायम ठेवण्यासाठी आयोजकांचा मोठा निर्णय  

Updated: Sep 19, 2022, 11:28 AM IST
यंदा पुरुषोत्तम करंडकास कोणीही पात्र नाही? स्पर्धेच्या अनपेक्षित निकालानं एकच खळबळ title=

अरूण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे : महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकासाठी यावर्षी एकाही महाविद्यालयाचा संघ पात्र ठरला नाही. स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा दर्जा कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आयोजकांनी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. सत्र सुरू होतात विद्यार्थी कलावंतांना या स्पर्धेचे वेध लागतात. या स्पर्धेतून आजवर नाट्य तसेच सिने क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत घडले आहेत. त्यामुळे या स्पर्धेकडे उच्च गुणवत्तेची स्पर्धा म्हणून पाहिले जाते.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी पार पडली. त्यानंतर स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले. त्यानुसार विविध प्रकारची पारितोषिके घोषित करण्यात आली. विशेष म्हणजे विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहित करण्यात आलं. मात्र प्रतिष्ठेच्या समजल्या करंडकावर नाव कोरण्याची संधी त्यांना मिळाली नाही.

पी आय सी टी च्या संघाने सादर केलेली 'कलिगमन' ही एकांकिका यावर्षीची सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली. या एकांकिकेला 5001 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आले. बारामतीतील टीसी कॉलेजच्या 'भू भू' या एकांकिकेतील अभिनयासाठी सनी पवार या विद्यार्थ्याला पंधराशे रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. 

मात्र या पुरस्कारासोबत देण्यात येणारा नटवर्य केशवराव दाते करंडक त्याला प्रदान करण्यात आला नाही. सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयाचं पारितोषिक कमिन्स कॉलेजच्या चाराने एकांकिकेतील अभिनयासाठी तन्वी कांबळे हिला देण्यात आले.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मॉडर्न कॉलेजच्या गाभारा एकांकिकेची दिग्दर्शिका प्रतीक्षा शेलार हिला देण्यात आले. तिलाही करंडक न देता पुरस्काराची रक्कम म्हणून केवळ रोख रुपये पंधराशे प्रदान करण्यात आले.

यावर्षीच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी परेश मोकाशी, पौर्णिमा मनोहर आणि हिमांशू स्मार्त यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कलोपासक संस्थेच्या वतीने भरत नाट्य मंदिरात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पुरुषोत्तम करंडकासाठी स्पर्धेच्या नियमानुसार एकही संघ तसेच कलावंत पात्र ठरला नाही. त्यामुळे सर्वांनाच अपात्र ठरवत करंडक प्रदान न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.