वसई किल्ल्यातील बिबट्या मोकाटच, शहरातील 'हा' रस्ता संध्याकाळी बंद, रोरोच्या 2 सेवाही रद्द

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात आढळलेल्या बिबट्यामुळं रोरो सेवेच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, एक रस्ताही संध्याकाळनंतर बंद करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 21, 2024, 05:57 PM IST
वसई किल्ल्यातील बिबट्या मोकाटच, शहरातील 'हा' रस्ता संध्याकाळी बंद,  रोरोच्या 2 सेवाही रद्द title=
vasai bhayander roro service stop after 5 pm due to Vasai Fort Leopard

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही वन विभागाला यश आलेले नाही. अशावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वसईतील प्रमुख रस्ता संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे. 

वसई किल्ला परिसरात नेहमीच गजबजाट असतो. येथे रहिवाशांचे वास्तव्य आहे. 29 मार्च रोजी पहिल्यांदा बिबट्या आढळल्या होता. सीसीटीव्हीमध्येही बिबट्याचा वावर कैद झाला होता. मोकाट फिरत असलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने पिंजरे उभारले आहेत. मात्र, अद्यापही त्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. बिबट्याच्या वावरामुळं किल्ला परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन फिरत आहेत. अशातच रोरो सेवाही संध्याकाळनंतर बंद ठेवावी अशी मागणी होत होती. 

बिबट्या पकडण्यासाठी वसई किल्ल्यातील रस्ता संध्याकाळी सात नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किल्ल्यातील लोकांच्या सततच्या वावरामुळं बिबट्या पकडण्यास अडचणी येत आहेत, असं वन विभागाचं म्हणणं आहे. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याकडे तो फिरकत नसल्याने किल्ल्याकडे जाणारा रस्ता संध्याकाळी काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

बिबट्या फिरत असल्याने नागिरकांना रात्रीचा प्रवास करणे टाळावे, असं अवाहन वन विभागाने केले आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, हा बिबट्या तुंगारेश्वर अभयारण्यातून वसई किल्ला परिसरात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ठिकाणी पिंजरे आणि कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा सतत मानवी वर्दळ आणि रो-रो फेऱ्या यामुळं त्याला पकडण्यास अडचणी येत आहेत. 

रो-रोच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द

बिबट्याला अद्याप जेरबंद करण्यात यश आलं नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संध्याकाळच्या रो-रो सेवेच्या दोन फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुरातत्व खाते आणि वनविभागाने महाराष्ट्र सागरी मंडळाला तसे पत्र दिले होते. त्या पत्रावर निर्णय घेत अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

वसई ते भाईंदर या रोरो सेवेच्या शेवटच्या दोन फेऱ्या १३ एप्रिल पासून रद्द केल्या आहेत. ५.१५ आणि ६.४५ अशा फेऱ्या रद्द केल्या असून वसई वरून ३.४५ ची शेवटची फेरी असेल तर भाईंदर वरून ४.३० वाजता असणार आहे, अशी माहिती रोरो व्यवस्थापकांनी दिली आहे.