Vajramuth Sabha : नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज (रविवार 16 एप्रिल 2023) पार पडणार आहे. राजच्याच्या राजकारणात अनेकांचच लक्ष लागून राहिलेल्या या सभेसाठी खुद्द उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोलें यांच्यासह मविआचे बरेच बडे नेते उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील या सभेच्या माध्यमातून मविआतर्फे भाजप- शिंदे सरकारवर नेते हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या सभेसाठी 60 हजारांच्या वर उपस्थितांची हजेरी असू शकते. किंबहुना येणाऱ्यांच्या आसनव्यवस्थेची व्यवस्थाही सभास्थळी करण्यात आली आहे. या सभेमध्ये एका मविआमधील प्रत्येत पक्षातून २ नेते बोलतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
नागपुरातील सभेसाठी नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता सध्या पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे. सभा ज्या भागात पार पडणार आहे तिथं असणाऱ्या 7 पोलीस स्थानकांतील जवानांना बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आलं आहे. पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्त यामध्ये लक्ष घालताना दिसणार आहेत.
नागपुरातील वज्रमूठ सभा ही महाराष्ट्राच्या राजकारच्या दृष्टीनं महत्त्वाची सभा ठरेल, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी दिली. यावेळी तिन्ही पक्षप्रमुख सभेसाठी उपस्थित राहून उद्धव ठाकरे यांचं महत्त्वाचं भाषण असेल अशीही माहिती त्यांनी दिली.
एकिकडे मविआच्या वर्जमूठ सभेसाठी बड्या नेत्यांची उपस्थिती असणार असल्याचं म्हटलं जात असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीवर मात्र प्रश्नचिन्हं उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. एकिकडे नाना पटोले यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीची हमी दिली असली तरीही दुसरीकडे नागपुरातील या सभेत जयंत पाटील यांच्यासह अनिल देशमुख यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींवर अजित पवार यांचं मौन पाहता आता सभेच्या वेळीच त्यांच्या हजेरीवरून पडदा उचलला जाणार, हेच खरं.
सभेत नेते कडाडणार, की अवकाळीची वीज?
दरम्यान, नागपुरातील वज्रमूठ सभेवर पावसाचं सावटही असणार आहे. हवामान विभागानं जारी केलेला यलो अलर्ट पाहता आता सभेत नेत्यांच्या भाषणांची चर्चा होणार की अवकाळीचा तडाखा बसणार हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागपूर वेधशाळेच्या माहितीनुसार जिल्ह्यात रविवार पावसाळी असून याचे थेट परिणाम या वज्रमूठ सभेवरही होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.