पुणे, नाशिक : Untimely rain hit farmers in Maharashtra : राज्यात डिसेंबर महिन्याचा सुरुवातीला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. 2 डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या कांदा, हरभरा, गहू या रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. त्यातच ढगाळ हवामाना मुळे देखील या नकदी पिकावर रोगराई पसरली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला.
पिकांवर रोग पसरल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार औषध फवारणी करावी लागतेय. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याचे मत बारामतीतीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काढणीला आलेला लाल कांदा जवळपास 50 ते 60 टक्के खराब झाला. त्यामुळ आता उरला सुरला कांदा काढणीसाठी शेतकरी जोमाने कामाला लागलेत.सध्या लाल कांद्याला प्रतिक्विंटल दीड हजार रुपायांच्या पुढे भाव मिळत आहे.मिळेल त्या भावात कांदा विकून पैसे पदरात पाडून घेण्यासाठी कांदा उत्पादकांची लगबग सुरू आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणानंतर विमा कंपन्यांच्या जाचक कारभाराला सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर 98 हजार 361 शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले. मात्र त्यापैकी 23 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 11 कोटी 41 लाख 38 हजार रुपये रक्कम जमा झाली. पण ही रक्कम निम्म्यापेक्षा कमी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे तर हा मदतीचा पहिला हफ्ता असेल अशी शक्यता कृषी अधिक्षकांनी व्यक्त केली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका अमरावतीमधल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. वरुड-मोर्शी तालुक्यात रोगराईमुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊ लागली आहे. शेतकऱ्यांवर संत्रे फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येरला गावातील राजेंद्र जगाते यांनी चार एकरातील संत्र्याची झाडं जेसीबीनं काढून टाकलीत. तब्बल 450 झाडांवर या शेतकऱ्याने जेसीबी चालवला आहे.