राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, शेतकरी पुन्हा हवालदिल

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे थैमान घातलं आहे.  

Updated: Mar 2, 2020, 08:20 AM IST
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, शेतकरी पुन्हा हवालदिल title=

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती उद्भवली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताला लागलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे थैमान घातलं आहे. शेतीचं बरचं नुकसान झाल्यामुळे समस्त शेतकऱ्यांचे सरकारी मदतीकडे डोळे लागले आहेत 

अहमनदगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान
अहमनदगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. नगर शहरासह पाथर्डी तालुक्यात तासभर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी कांदा, गहू आणि हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं.

सांगली परिसरात मुसळधार पाऊस
सांगली परिसरात रविवारी रात्री अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. सांगली उपनगराल्या आठवडी बाजारात लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

अमरावतीत अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ
अमरावतीतही अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडालीय. चांदुरबाजार इथे जोरदार पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला हरभरा, गहू आणि कपाशी पिकाला याचा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस असाच सुरू राहिल्यास रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची भीती बळीराजाला सतावत आहे.

वर्धात अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित 
वर्धा जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या...अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेचे सापडलाय. पावसात शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विजेच्या गडगडाटामुळे काही ग्रामीण भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. काही वेळ आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत
अकोला जिल्ह्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावलीय. अकोला जिल्ह्यातील पातूर भागातील काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झालीय. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, फुलशेती आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.