वैभव बालकुंदे, झी मीडिया
Latur Crime News: धक्कादायक बातमीने लातूर हादरले आहे. इंग्रजी शाळेत शिक्षण घेता येत नसल्याने आईने मुलीला घेऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. नैराश्यातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीला घेऊन विहिरीत उडी मारली आहे. त्यात मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी येथे घडली. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भाग्यश्री व्यंकट हालसे व समिक्षा व्यंकट हालसे असे मयत मायलेकीचे नाव आहे.
माळेगाव कल्याणी येथील व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी समिक्षा आहेत. त्यांच्याकडे जेमतेम शेती आहे तर शेळ्या राखून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तरीदेखील दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अशी त्यांची इच्छा होती. दोन्ही मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होते. दरम्यान आपली दोन्ही लेकरं इंग्रजी शाळेत शिकावेत अशी इच्छा त्यांची पत्नी भाग्यश्री यांची होती. त्यामुळे त्या पतीकडे वारंवार चौकशी करीत मुलांना इंग्रजी शाळेत पाठवू असे म्हणत होत्या.
भाग्यश्री वारंवार मुलांना इंग्रजी शाळेत टाकू म्हणून हट्ट करत होती. त्यावर पती दररोज तिची समजूत काढून शाळेत पाठवू असे म्हणत होते. मात्र त्यास उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त झाल्या आणि पत्नी घरातील मुलीला सोबत घेऊन गावाबाहेर पडल्या. त्यांनी गावाजवळील एक विहीर गाठली आणि पतीला फोन करुन आपल्या दीदीचं शेवटचं तोंड पहा म्हणत विहिरीत उडी घेतली.
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघींचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मयताचे वडील अरुण बोडके यांच्या माहितीवरुन औराद शहाजानी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.