उल्हासनगरमध्ये महावितरणचा गलथान कारभार, प्रशासनाचं दुर्लक्ष

महावितरणाच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त

Updated: Dec 17, 2018, 01:57 PM IST
उल्हासनगरमध्ये महावितरणचा गलथान कारभार, प्रशासनाचं दुर्लक्ष title=

उल्हासनगर : सध्या उल्हासनगरमध्ये महावितरणचा गलथान कारभार सुरु आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या चुकींमुळे आणि हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेकांना तर दर महिन्याला महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. वेळेवर बिल भरल्यानंतरही नागरिकांना चुकीची बिलं पाठवली जात आहेत. रिडींग नेतांना देखील ती योग्य प्रकारे नेली जात नाही. रिडींगसाठी मीटरचा फोटो काढला जातो पण तो बिलवर कधी स्पष्ट दिसतच नाही. फोटो दिसत असला तरी बिलमध्य़े अंदाजे रिडींग दिलं जातं. कमी वापर होत असला तरी नागरिकांना अधिक बिल पाठवलं जात असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे.

तक्रारी करुनही महावितरणचे अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. तक्रारी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पुढच्या कामासाठी पुन्हा बोलवलं जातं. चुका नसतानाही कामाच्या ठिकाणी सुट्टया टाकून नागरिकांना महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. महावितरणने डिजीटल अॅप आणलं आहे. पण डिजीटल इंडियांचं स्वप्न पाहाणाऱ्या सरकारने महावितरणचं डिजीटल अॅप किती जोरात काम करतं यावर देखील लक्ष दिलं पाहिजे. अॅपच्या माध्यमातून तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नाही. टोल फ्री क्रमांकावर तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नाही. नागरिकांकडून महावितरणविरोधात राग व्यक्त केला जात आहे. ही समस्या फक्त एका शहराचीच आहे असं नाही. विविध ठिकाणी अशा समस्या पाहायला मिळतात.