औरंगाबाद : राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होत असलेल्या सभेमुळे औरंगाबादमध्ये वातावरण तापलं आहे. आता शिवसेनेनंही सभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा व्हावी, यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. गेल्या अनेक दिवसांत शहरात उद्धव ठाकरेंची सभा झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पक्षाच्या अन्य मोठ्या नेत्यांनी सभा घ्यावी अशी मागणी करत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेला करारा जबाब देण्याची तयारी शिवसेनेनं केली आहे. 8 जूनला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंची जिथं सभा होणारं आहे तिथच उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे.
शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त होणा-या या सभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे तमाम बडे नेते उपस्थित असतील. याबाबत माहिती देताना खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर टीका केली.
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेची कसरत वाढली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी राज ठाकरे यांनी हिदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याला विरोध केल्यानंतर देशभरात त्याची चर्चा सुरु झाली. उत्तरप्रदेशात तर त्याचे पडसाद ही पाहायला मिळाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं याबाबत राज ठाकरे यांनी कौतूक ही केलं आहे.
राज ठाकरे सभेत काय बोलणार याची उत्सूकता कायम आहे. पण राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे त्यांना काय उत्तर देतात याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.