'छत्रपती जन्माला आले नसते तर आज...'; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: नाशिकमधील शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना अयोध्येत करण्यात आलेल्या भाषणावरुन टीका केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 23, 2024, 01:06 PM IST
'छत्रपती जन्माला आले नसते तर आज...'; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे title=
नाशिकमध्ये बोलताना साधला निशाणा

Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच तुलना होऊ शकत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली. पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना उद्धव ठाकरेंनी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर गोविंदगिरी माहाराजांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. यावरुनच उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून छत्रपती जन्माला आल्यानेच आज राम मंदिर उभं राहू शकलं असं म्हटलं.

एकपत्नी असा स्वत:चा उल्लेख

"बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून मी बाळासाहेबांना अभिवादन करतो. विषय खूप आहेत पण आज रामायणातले बारकावे संजय राऊतांनी सांगितले. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते यांनी सामनाचे श्लोक सांगितले. म्हणजे सामना कसा करावा हे सांगितल्याने सामनाचे श्लोक," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी प्रभू श्रीरामचंद्रांप्रमाणे संयम उद्धव ठाकरेंकडे असल्याचं म्हटलं होतं. "आपण प्रभू श्रीरामचंद्राचा अनुयायी कसा असला पाहिजे हे सांगताना तुम्ही माझा उल्लेख केला. संयम, एकवचनी, एकपत्नी... तुम्ही म्हणता ते खरंच आहे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र आज जे काही रामाचे मुखटवे घालून रावण फिरत आहेत त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. रामाचा अनुयायी म्हणून तुम्ही जे म्हणालात बरोबर आहे. तुम्ही माझी तुलना प्रभू रामांशी केली नाही याबद्दल मी तुमचे आभार मानतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदींची छत्रपतींशी तुलना केल्यावरुन टीका

अयोध्येतील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेल्या तुलनेच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. "काल तिकडे (अयोध्येत) सर्व अंधभक्त जमले होते. त्यांचे जे काही ज्ञान, बुद्धी आहे त्याचा आदर करतो. पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी करताना आजचे शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान अशी केली. अजिबात नाही. त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकलं नसतं. आज तुम्ही तिकडे जाऊन जे काही बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेस हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच. नाहीतर हे कोण्या येऱ्या गबाळ्याचं काम नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मी 2018 ला अयोध्येला गेलो, जाताना...

"2018 ला मी अयोध्येला जाऊन आलो. आज मोदी अयोध्येला गेले. मात्र यापूर्वी नाही गेले. पंतप्रधान होण्याआधी गेले असतील. जसे आपले फडणवीस गेले असं म्हणतात त्याप्रमाणे. इतके वर्ष विषय चालला आहे तर 2018 मध्ये मी नोव्हेंबरमध्ये शिवजन्मभूमीवरुन मुठभर माती घेऊन अयोध्येला गेलो होतो. तुम्ही माना अथवा नका मानू पण पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननिय सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीचा निकाल दिला. मला वाटतं हा त्या माजीचा महिमा आहे," असंही उद्धव म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले गोविंदगिरी महाराज?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 दिवस केलेला उपवास आणि 11 दिवस अधिष्ठान म्हणून जमिनीवर झोपण्याचा उल्लेख करत गोविंदगिरी महाराजांनी त्यांच्या तपश्चर्येचं कौतुक केलं. हे कौतुक करताना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. "आम्ही तुम्हाला 3 दिवस जमीनीवर झोपण्यास सांगितलं होतं. तुम्ही या थंडीत 11 दिवसांपासून जमीनीवर झोपत आहात. मित्रांनो, ब्रम्हाने सृष्टीला निर्माण केलं तेव्हा त्यांनी एक शब्द ऐकला होता. तो भारताच्या संस्कृतीचा महत्त्वाचा शब्द आहे. तप तप इती! आमच्या गुरुंचे गुरु परगुरु कांचीचे परमाचार्यजी महाराज करायचे तपश्चर. आज तपाची कमी होत आहे. आम्ही आज तो तप तुमच्यात पाहिला. ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक राजा आठवतो ज्यामध्ये हे सारं काही होतं. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज!" असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.

मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना

गोविंदगिरी महाराज इतक्यावरच न थांबता त्यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. "लोकांना कदाचित ठाऊक नाही. जेव्हा ते मल्लिकार्जूनच्या दर्शनासाठी श्री शैलमवर गेले तेव्हा 3 दिवसांचा उपवास केला. 3 दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी म्हटलं, मला राज्य नाही करायचं. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शीवाच्या तपश्चर्येसाठी जन्मलो आहे. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत नेऊ नका. त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं आणि परत घेऊन आले की हे सुद्धा तुमचं कार्य आहे. आज आपल्याला तशाच प्रकारचे महापुरुष प्राप्त झाले आहेत ज्यांना माता जगदंबेने हिमालयातून जा भारत मातेची सेवा कर म्हणत परत पाठवलं. तुम्हाला भारत मातेची सेवा करायची आहे," असं गोविंदगिरी महाराज म्हणाले. "मी स्वत:ला श्रद्धेच्या बाबतीत कधी भावूक होत नाही. मात्र काही ठिकाणं अशी असतात की आपोआप आपण नतमस्तक होतो. असे एक स्थान या उच्च पदस्थ राजश्रीने दाखवलं तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी रामदास महाराजांची आठवण झाली. त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं की निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी... आपल्याला आज एक श्रीमंत योगी प्राप्त झाला," असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.