मुंबई : 'सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे', या वाक्यात गुजरात निवडणुकीचे विश्लेषण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
‘हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा असून 'गुजरात मॉडेल' डळमळले असल्याचे सांगत भाजपाच्या निवडणूकीतील प्रचारनितीवर सडकून टीका केली आहे.
१८२ जागांसाठी लढल्या गेलेल्या गुजरात निवडणूकीत ९९ जागांवर भाजपा तर ८० जागांपर्यंत मजल मारली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला चांगलेच फैलावर धरले आहे.
'गुजरात व हिमाचलात भाजपचा विजय झाला, हा विजय होणारच होता. पण चर्चा मात्र गांधी यांचीच झाल्याचे उद्धव म्हणाले. भाजपा जिंकली तरीही काँग्रेसचाही पराभव झाला नाही व काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण झाले नसल्याचेही उद्धव यांनी सांगितले.
गुजरातेत भाजपला १५० पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही असे शेवटपर्यंत छातीठोकपणे सांगितले गेले. पण शंभराचाही आकडा गाठताना दमछाक झाल्याची टीका उद्धव यांनी केली आहे.
वारे बदलले नाहीत हे खरे, पण वारे मंदावले आहेत! उसळलेल्या लाटा थंडावल्या आहेत. अत्यंत परखडपणे बोलायचे तर, भाजप नेतृत्वासमोर राहुल गांधी, हार्दिक पटेल ही तर माकडेच अशा वल्गना मोडीत निघाल्या आहेत.
२२ वर्षांत गुजरातमध्ये भाजपने ‘विकास’ म्हणजे नक्की काय केले यावर प्रचारत कोणी बोलले नाही. तर जाहीर सभांत बोलताना पंतप्रधान गुजराती जनतेला भावनिक व अस्मितेची आवाहने करीत राहिले.
वातावरण संपूर्ण विरोधात जात आहे हे दिसताच पाकिस्तान व हिंदू-मुसलमान हे मुद्दे जोरात प्रचारात आणले गेले, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.
हार्दिकला ‘नग्न’ दाखविणारी सीडी भाजपने समोर आणून प्रचाराची पातळी खालावल्याची टीका उद्धव यांनी केली आहे.