Sangli Crime News : पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं. त्यावर उपाय म्हणून पोलीस स्टेशनच्या गेटवरच कसायाकडून पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा संतापजनक प्रकार लातूर जिल्ह्याच्या उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये घडला. ही घटना ताजी असतानाच ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार करण्यात आला आहे. सांगलीच्या मिरज येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सांगलीच्या मिरज येथील महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सरोजिनी माळी यांच्या घरासमोर हा भानमतीचा प्रकार घडला आहे. माळी यांच्या घराच्या गेटवर लिंबू, बाहुली, नारळ, हळदी, कुंकू टोचलेल्या सुई असे साहित्य असलेली पिशवी ठेवण्यात आले होते. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर माळी यांनी सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांनाही दिली.
शिवसेना उद्धव ठाकरे महिला पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून करण्यात आला आहे. अशा प्रकारे जादू टोणा करण्याचा प्रयत्न करुन भिती निर्माण करणाऱ्याचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी महिला जिल्हा प्रमुख मनीषा पाटील यांनी केली आहे.
लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेटवर बोकड कापणं पोलिसांना चांगलंच महागात पडलंय. याप्रकरणी एका पोलीस अधिका-याला निलंबित करण्यात आलंय. तर, 8 पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आलीय... संबंधित पोलीस निरीक्षकासह सर्वांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेत. गुन्हे वाढत असल्यानं शांती करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दारात बोकडाचा बळी देण्यात आला होता. झी २४ तासच्या बातमीनंतर संबंधित पोलिसांवर ही धडक कारवाई करण्यात आली. दरम्यान लातूरच्या उदरगीरमधील बोकडप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नवी गाडी घेतली म्हणून तिथल्या पोलीस अधिका-यानं पार्टी दिली. मात्र तेही चूकच असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रियकरासोबत मुलीचं लग्न होऊ नये म्हणून आईनेच पोटच्या मुलीवर करणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. कोल्हापूरच्या आजरामधील मलिग्रे गावात हा प्रकार घडला होता. रेश्मा बुगडे असं या महिलेचं नाव आहे. रेश्मा बुगडे या महिलेनं भोंदूबाबाच्या मदतीने आपल्या मुलीचे प्रियकरासोबत लग्न होऊ नये म्हणून स्मशानभूमी परिसरात करणी केली. करणी केलेल्या ठिकाणी प्रियकर आणि मुलीचा फोटो, लिंबू, चंदेरी रंगाचा कागद असे साहित्य पुरून त्यावर एक अंडे, दारू ठेवल्याचे निदर्शनास आलंय...या प्रकारानंतर आजरा पोलिसात महिलेसह भोंदूबाबा असे चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.