डीजे वादकांना कडाक्याच्या थंडीत नग्न डांबून विजेचा शॉक, दंडूका-पट्ट्याने मारहाण

नाशिक शहरातील दोन डीजे वादकांना गावगुंडांनी अमानुष मारहाण करत, लैंगिक अत्याचार केलेत.

Updated: Jan 11, 2020, 06:53 PM IST
डीजे वादकांना कडाक्याच्या थंडीत नग्न डांबून विजेचा शॉक, दंडूका-पट्ट्याने मारहाण title=

नाशिक : शहरातील दोन डीजे वादकांना गावगुंडांनी अमानुष मारहाण करत, लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली. शहरालगत असलेल्या दरी-मातोरी गावात असलेल्या एका फार्महाऊसवर वाढदिवसानिमित्त पार्टी सुरू असतांना हा प्रकार घडला. दहा वाजेनंतर डीजे वाजविण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. दोघेही पीडित जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून संशयित आरोपींवर नाशिक तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

गुंडांच्या वाढदिवसात डीजे वाजवणे लवकर बंद केल्याने नाशिकमधील दोन तरुणांना अमानुषपणे मारहाण करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. संदेश काजळे याच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त बाणगंगा फार्महाऊसवर डीजे वाजवण्याची सुपारी पंचवटीतील दोन युवकांना दिली होती. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी अजून एका युवकास सोबत घेऊन तीघे दरी-मातोरी येथे डिजे घेऊन गेले होते. पार्टी रात्री साडेदहा नंतरही सुरू राहिल्याने पीडित तरुणांनी नियमानुसार डीजे वाजवता येत नसल्याने पुढे डीजे वाजवण्यास नकार दिला. डीजे सुरू असतांना बंद का केला म्हणून हवेत गोळीबार करत दहा ते बारा जणांनी एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केलीय. 

हे प्रकरण मारहाण करण्यापर्यंतच न थांबता लैंगिक अत्याचार करण्यापर्यंत गेले. अत्याचारांमध्ये कपडे काडून गुप्त अंगांवर सिगारेटचे चटके, बेल्टने आणि बांबूने मारहाण, थंड पाणी अंगावर टाकत ठिकठिकाणी विजेचा शॉकही देण्यात आले. यासह दारूच्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्यांनी मारहाण करत रात्रभर अत्याचार केले.  

हे प्रकरण इथपर्यंतच न थांबता पोलीस आयुक्तांच्या नावाचा उच्चार करत अपशब्द वावरत काहीही होऊ शकत नाही, अशा दमदाट्या देत आमदारांचा नातेवाईक असल्याचा दावा करत जीवे ठार मारण्याचा धमक्या गावगुंडांकडून केला जात होता असा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. शिवीगाळ करत आमच्यात लैंगिक अत्याचार करायला लावत होते, असा गंभीर आरोप देखील पीडित तरुणांनी केला आहे.

हे दोघेही पीडित तरुण गंभीर जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी याबाबत दखल घेत पीडितांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र यातील बहुतांश संशयित राजकीय मंडळींच्या संबंधित असल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी पुढे काय वळण मिळतं आणि काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

नेमक काय घडलं?

नाशिक शहरातील दोन डीजे वादकांना अमानुष मारहाण
- दोघा डीजे वादकांना रात्रभर डांबून ठेवत त्यांना नग्न करून मारहाण केल्याचा धक्कादायक बाब उघड
- कडाक्याच्या थंडीत दोघांना नग्न करून दिला विजेचा शॉक, दांडके आणि पट्ट्यानंही अमानुष मारहाण केल्याची अत्याचार केलेल्या मुलांची माहिती
- नाशिक जवळच्या दरी-मातोरी शिवारातील फार्महाऊसमधील धक्कादायक प्रकार
- दोघा डीजे वादकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केलं दाखल
-संशयित आरोपींविरोधात नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू

- वाढदिवसाच्या पार्टीसाठी डीजे वादकांना बोलावलं होतं फार्महाऊसवर
- रात्री 10 वाजेनंतर डीजे वादकांनी डीजे वाजवण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी रात्रभर केली अमानुष मारहाण