नाशिक: कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी मालेगावात गेलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबाबतीत एक धक्कादायक घटना घडली. शहरातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर राजेश टोपे यांनी सरकारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. बैठक सुरु असतानाच ही माहिती समोर आली. त्यामुळे हे दोन्ही अधिकारी बैठकीतून तात्काळ निघून गेले.
या प्रकारामुळे मालेगावातील प्रशासन चांगलेच धास्तावले आहे. नाशिकमध्ये मालेगाव हा कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट आहे. शहरातील दाटीवाटीच्या वस्तीमुळे कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. मालेगावात आतापर्यंत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता थेट पालिकेतील बडे अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने चिंतेत भर पडली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मालेगावात पत्रकारपरिषदही घेतली. यावेळी त्यांनी मालेगावकडे दुर्लक्ष करणार नाही, असे आश्वासन दिले. मालेगावात आता परिस्थिती सुधारत आहे, अनेक रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याचे त्यांनी म्हटले. कोरोना उपचारासाठी मालेगावात नवीन रुग्णालय सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंत मालेगावातील रुग्णांचे अहवाल मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता पुण्यात मालेगावमधील तपासण्यांचा अहवाल देण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल. त्यामुळे २४ तासात मालेगावमधील चाचण्यांचे अहवाल उपलब्ध होतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
तसेच मालेगावातील खासगी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे संकेतही आरोग्यमंत्र्यांनी दिले. अशा परिस्थितीत डॉक्टरांना घरी बसणे शोभत नाही. खासगी डॉक्टरांनी सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. तसेच आरोग्य खात्यातील डॉक्टरही कामावर गैरहजर राहिल्यास त्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला.