कुचिक बलात्कार आरोप प्रकरणात ट्विस्ट! पीडित तरुणीचा चित्रा वाघ यांच्यावर खळबळजनक आरोप

कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे

Updated: Apr 12, 2022, 05:26 PM IST
कुचिक बलात्कार आरोप प्रकरणात ट्विस्ट! पीडित तरुणीचा चित्रा वाघ यांच्यावर खळबळजनक आरोप title=

पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणानं नाट्यमय वळण घेतलं आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीनं मोठा गौप्यस्फोट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवण्यात आलं, तसच पोलिसांना हवा तसा जबाब द्यायला वाघ यांनीच भाग पाडलं, असा गंभीर आरोप पीडित तरुणीनं केला आहे. मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचं तरुणीनं म्हटलंय. 

पीडित तरुणीचा दावा
रघुनाथ कूचिक बलात्कार प्रकरणात पीडित मुलींला पोलिसांनी इंजेक्शन देऊन अपहरण केल्याचे गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केले होते, मात्र आता पीडित मुलीने समोर येऊन चित्रा वाघ यांनी दबाव टाकून अपहरणाचं षडयंत्र रचले होतं असा धक्कादायक आरोप केला आहे.
गोव्याला आणि मुंबईला चित्रा वाघ यांनीच आपल्याला डांबून ठेवलं होतं, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. तसंच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदांमध्ये दाखवलेले मेसेजचे सगळे पुरावे बनावट सॉफ्टवेअरचा वापर करुन तयार करण्यात आले होते असंही या पीडित मुलीनं म्हटलं आहे. रघुनाथ यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा ही चित्रा वाघ यांच्या दबावामुळेच दाखल केला असल्याचं सांगतेय.

चित्रा वाघ यांनी आरोप फेटाळले
पीडित मुलीने केलेले गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी फेटाळून लावले आहे. पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी आपली बाजू मांडली. रघुनाथ कुचिक प्रकरणी पीडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले, खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव  येतात 
फेब्रुवारीपासून एकटी लढणार्या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला, मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

'घाणेरडं राजकारण'
हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. घाणेरडे राजकारण करत वैयक्तिक फायद्यासाठी एका मुलीच आयुष्य चित्रा वाघ यांनी उध्वस्त केले अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली आहे.