नवरात्रीआधीच तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले; अभिषेक आणि पुजा 'या' वेळेत होणार

Tulja Bhavani Temple Open: शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून तुळजाभवानी देवीचे मंदिर 22 तास खुले राहणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 12, 2023, 04:36 PM IST
नवरात्रीआधीच तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले; अभिषेक आणि पुजा 'या' वेळेत होणार title=
Tuljabhavani temple will be open for 22 hours from 13 oct

Tulja Bhavani Temple: पुढच्याच आठवड्यात देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. राज्यातही देवीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात. त्याचबरोबर देवीच्या मंदिरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानाने भाविकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे, नवरात्रकाळात व पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचे मंदिर 22 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. 

नवरात्रोत्सवाल राज्यातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर असतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन शक्तीपीठं आहेत. देवीची ही स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळं भाविकही मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी जातात. अशावेळी भाविकांच्या दृष्टीने तुळापूर मंदिर संस्थानाने 13 ऑक्टोबरपासून मंदिर 22 तास खुले ठेवण्याची घोषणा केली आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या नवरात्रकाळात होणाऱ्या पुजा आणि दर्शनवेळेत बदल करण्यात आला आहे. 13 व 14 ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत येणार असल्याने आणि 15 ते 24 ऑक्टोबर नवरात्र उत्सव असल्याने तसेच 28 ते 30 ऑक्टोबर काळात अश्विन पौर्णिमा असल्याने वेळेत बदल करण्यात आले आहेत. 

देवीचे मंदिर रात्री 11 वाजता बंद होऊन पहाटे 1 वाजता चरणतीर्थ होऊन मंदिर पुन्हा दर्शनासाठी उघडले जाणार आहे. याकाळात देवीचा अभिषेक आणि पुजा सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न होणार आहे. तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी माहिती दिली आहे. 

तुळजापूर मंदिराची अख्यायिका

भारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराज, भोसले घराण्याची कुलदेवता आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.