प्यारवाली लव्हस्टोरी, सिनेमाच्या स्टोरीपेक्षाही ऋषिकेश आणि प्राचीची अफलातून प्रेमकथा

एक आगळावेगळा प्रेमविवाह (love marriage) पार पडला.   

Updated: Sep 11, 2021, 11:08 PM IST
प्यारवाली लव्हस्टोरी, सिनेमाच्या स्टोरीपेक्षाही ऋषिकेश आणि प्राचीची अफलातून प्रेमकथा title=

तुषार तपासे झी 24 तास सातारा  : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. जोडीदार कसाही असला तरी एकमेकांना सांभाळून घेणारा असावा, एकमेकांना जीव लावणारा असावा. याचाच प्रत्यय फलटणकरांना आलाय. फलटणमध्ये (Phaltan) एक आगळावेगळा प्रेमविवाह (love marriage) पार पडला. एखाद्या सिनेमात पाहायला मिळावी अशीच या दोघांची लव्ह स्टोरी आहे. (true love story of rushikesh more and prachi sawant in phaltan satara)

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोहचलेलं

आजच्या स्वार्थी जगात असं निखळ प्रेम पाहायला मिळणं तसं दुर्मिळच. पण साताऱ्यातल्या या नवदाम्पत्याकडे पाहिल्यानंतर कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तीची खऱ्या अर्थानं प्रचिती येते. साताऱ्यातल्या फलटणमध्ये राहणारा ऋषिकेश मोरे आणि प्राची सावंत अलिकडेच लग्नबंधनात अडकले. पण त्यांच्या प्रेमाची कहाणी इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. ऋषिकेशला दोन्ही हात नाही, पायानेदेखील अपंग आहे. मात्र प्राचीनं प्रेम केलं ते त्याच्या निखळ स्वभावावर. तिनं प्रेम केलं ते त्याच्या जिद्दीवर.

ऋषिकेश दिव्यांग असला तरी संगीताची त्याला उत्तम जाण आहे. तीन वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली. पुढे अल्बम, चित्रपटासाठी गाणी लिहिणं, रेकॉर्डिंग करणं असं काम ते करू लागलेत. ऋषिकेश चांगला म्युझिक कंपोजर असल्यानं प्राचीदेखील गाणी गाऊन त्याला साथ देवू लागली. प्रेमाचे सूर कधी जुळले हे त्यांनादेखील कळलं नाही. 

हल्ली प्रत्येक मुलीला नवरा बक्कळ पगार कमावणारा, स्मार्ट असावा असंच वाटतं. प्राची मात्र या सगळ्याला अपवाद ठरली आहे. तिला खऱ्या प्रेमातून आपला संसार फुलवायचाय अगदी कुसमाग्रज म्हणतात तसा. मातीत रूजलेला पण मेघापर्यंत पोहचणारा.