पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. 'ट्रिपल तलाक' प्रकरणात न्यायालयात दाद मागणाऱ्या एका महिलेला न्यायालय परिसरातच पेटवून देण्याचा प्रयत्न तिच्या पतीनं केला. पुण्यातील शिवाजी नगर स्थित कौटुंबिक न्यायालय परिसरात ही घटना घडली. हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या अंगावरही काटा उभा राहिला. मंगळवारी १९ जून रोजी दुपारच्या सुमारास कौटुंबिक न्यायालयात ट्रिपल तलाक प्रकरणावर सुनावणी होती. या खटल्यात गेल्या वर्षी पतीनं पत्नीला 'ट्रिपल तलाक' पद्धतीनं तलाक दिला होता. यावर महिलेनं न्यायालयात धाव घेतली होती.
सुनावणीसाठी पती-पत्नी दोघंही न्यायालयात उपस्थित होते. मे २०१५ मध्ये या दोघांचाही विवाह झाला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये पतीनं महिलेला एक कायदेशीर नोटीसही धाडली होती. पत्नीनं उत्तरादाखल तीन तलाक कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पोहचलं. मार्च २०१७ मध्ये महिलेनं पतीसमवेत आठ जणांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता.
पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती तिच्यावर खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता. इतकंच नाही तर त्यानं पैशांचंही लालूच दाखवून पाहिलं. परंतु, महिलेनं खटला मागे घेण्यास नकार दिला... त्यामुळे पतीनं न्यायालय परिसरातच महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि काही वकिलांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला थांबवलं... त्यामुळे महिलेचा जीव वाचला. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय.