मुंबई : एसटी महामंडळाचं (Maharashtra State Road Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात कर्मचाऱ्यांनी संपावर आहेत. कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिवहन मंत्री अनिल परब (transport minister Anil Parab) यांनी एसटीचं विलिनिकरण करण्यात येणार की नाही, याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या (ST Empolyee Strike) मुद्द्यावरुन तोडगा काढण्यासाठी आज आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) , गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि संपकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर अनिल परब बोलत होते. अनिल परबांनी संपावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावली होती. (transport minister anil parab give reaction over to demanded state transport Merger into State Government)
अनिल परब काय म्हणाले?
"या बैठकीतील विलिनिकरणाची मागणी ही फार आग्रही होती. पण विलिनिकरणाची मागणी आम्ही मान्य करु शकत नाही. कारण हा विषय हायकोर्टाच्या आदेशानुसार, उच्चस्तरिय समितीच्या समोर आहे. त्या समितीला 12 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्यावर कारवाई होईल. यावर हा कालावधी कमी करावा, अशी मागणी केली. जी मागणी आम्ही समितीसोबत बोलून आम्ही मान्य करु शकतो. समितीचा अहवाल लवकर देता आला, तर तसा आमचा प्रयत्न राहिल. समितीने विलिनिकरणाचा अहवाल दिला, तर शासन तो मंजूर करेल. पण समितीने नकारात्मक अहवाल दिला, तर त्याबाबत काय करायचंय, यावरही चर्चा झाली", असं परब म्हणाले.
"कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा मुद्दा प्रलंबित आहे.शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळायला हवं, अशी साधारण सर्व कर्मचाऱ्यांची मानसिकता आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करुन त्यावर आपण किती बोजा घेऊ शकतो, किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे गोष्टी करायच्या असतील तर, एकंदर काम करुन निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे", असं परब बैठकीत उपस्थित असलेल्या प्रतिनिधिंना म्हणाले असल्याचं सांगितलं.
"कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, त्याबाबत सरकारने सकारात्मक विचार ठेवलेला आहे. आता याबाबतीत ते कर्मचाऱ्यांशी बोलायला गेले आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांनी पुन्हा भेटण्याची दाखवली आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर पुन्हा रुजु व्हावं यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहे", असंही परब म्हणाले.
परिवहन मंत्र्यांची एसटी कर्मचाऱ्यांना विनंती
दरम्यान अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना विनंतीही केली आहे. "एखादा विषय न्यायप्रविष्ठ असताना आडमुठे धोरण स्वीकारुन संप आणखी वाढवू नये. कारण एसटी फार नुकसानात आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याला कामगारांनी मदत केली पाहिजे. आता त्यांचे प्रतिनिधि संपकऱ्यांसोबत चर्चा करायला गेले आहेत. चर्चा केल्यानंतर त्यांनी आज भेटण्याची तयारी दाखवली तर आज भेटू किंवा उद्या भेटू, असं परब यांनी स्पष्ट केलं.