लोणावळा : दिवाळी संपली असली तरीही शाळांना आणि खासगी आणि सरकारी कार्यालये तसेच कंपन्यांना मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळे थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या लोणावळा शहरात पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे.
शुक्रवार पासूनच लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली होती. मात्र रविवारी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत होती. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
एक्सप्रेस हायवेवर ही वाहनांची संख्या वाढलेली दिसून येते आहे. पावसाळा ऋतू सरला असल्याने येथील धबधबे आणि धरणातील पाणी कमी झाले असल्याने पर्यटक येथील राजमाची पॉईंट, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणांना पसंती देताना दिसून येत आहे.