टोमॅटोमुळे पुणेकर शेतकरी झाला कोट्यधीश! दिवसाला तब्बल 18 लाखांची कमाई

Pune Tomato Farmer News: कोट्यधीश झालेल्या या शेतकऱ्याने आपली सून आणि मुलाच्या मदतीने 12 एकरांमध्ये टोमॅटोची लागवड केली. त्यांच्या बागेतील माल बाजारपेठेत जाऊ लागल्यापासून मालाला चांगला दर मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 12, 2023, 04:39 PM IST
टोमॅटोमुळे पुणेकर शेतकरी झाला कोट्यधीश! दिवसाला तब्बल 18 लाखांची कमाई title=
त्यांनी 12 एकरावर टोमॅटोची लागवड केली आहे

Tomato Farming Become Crorepati Farmer: सध्या देशात टोमॅटोच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे दर किलोला 150 ते 160 रुपयांदरम्यान आहेत. एकीकडे या दरवाढीमुळे टोमॅटो घ्यावेत की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला असतानाच दुसरीकडे टोमॅटो उत्पदकांना मात्र या दरवाढीमुळे 'अच्छे दीन' आले आहेत. याच दरवाढीचा फायदा जुन्नरमधील एका शेतकऱ्याला झाला असून हा शेतकरी चक्क कोट्यधीश झाला आहे. या शेतकऱ्याला टोमॅटोची लॉटरी लागलीय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

कोण आहे शेतकरी?

टोमॅटोच्या जीवावर कोट्यधीश झालेल्या या शेतकऱ्याचं नाव आहे तुकाराम गायकर. गायकर हे पाचघर गावचे रहिवाशी आहेत. पाचघर हे पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं आहे. सर्वाधिक धरणांचा जिल्हा असलेल्या जुन्नर जिल्ह्यातील 12 महिने पाण्याचा फायदा इतर गावांप्रमाणे पाचघरलाही झाला. सुपीक जमीन आणि 12 महिने पाणी या दोन्ही अनुकूल परिस्थितीमुळे या गावात बागायती शेती मोठ्याप्रमाणात होते. या गावात प्रामुख्याने कांदा आणि टोमॅटोचं पीक घेतलं जातं. गायकर कुटुंबाची 18 एकरांची बागायती शेती आहे. त्यापैकी 12 एकरवर तुकाराम गायकर यांनी मुलगा ईश्वर आणि सून सोनालीच्या मदतीने टोमॅटोची लागवड केली होती. आता याच निर्णयामुळे ते कोट्यधीश झाले आहेत.

एक दिवसात कमवले 18 लाख

गायकर यांनी 12 एकरांवर टोमॅटो लावल्याने येथील 100 महिलांना या माध्यमातून हाताला कामही मिळालं आहे. शेतात मंडप बांधणे, तोडणी, टोमॅटो निवडणे, फवारणी करणे यासारखी कामची जबाबदारी सोनाली यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर सोनालीचा नवरा ईश्वर हा विक्रीचं व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन पाहतो. मागील 3 महिन्यांपासून जुन्नरच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने गायकर कुटुंबाला जणू लॉटरीचं लागली आहे. महिन्याभरात या 12 एकरामधून तब्बल 13 हजार कॅरेट टोमॅटो बाजारपेठेत विकली आहेत. यामधून त्यांना सव्वा कोटीहून अधिक रुपयांचं उत्पादन मिळालं आहे. सध्याच्या घडीला नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये क्रेटला 2100 रुपयांचा दर सुरु आहे. 11 जुलैला गायकर कुटुंबाने 900 कॅरेटची विक्री केली. त्यामुळे मंगळवारी या कुटुंबाला तब्बल 18 लाख रुपये मिळाले आहेत.

अनेक शेतकरी झाले कोट्यधीश

गायकर यांच्या शेतातील फळ बाजारात विक्री होऊ लागल्यापासून कॅरेटला सरासरी 1 हजार ते 2400 दर मिळतो. केवळ गायकरच नाही तर जिल्ह्यातील जवळजवळ एक डझन शेतकरी टोमॅटो दरवाढीच्या लाटेत कोट्याधीश झाले आहेत. नारायणगाव बाजार समितीमधील आर्थिक उलाढालीने ही 80 कोटींहून अधिकचा टप्पा ओलांडला आहे.