मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळील तिवरे धरण दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध घेण्याची मोहीम दहा दिवसानंतर एनडीआरच्या शोध पथकाने थांबविली आहे. आतापर्यंत २० मृतदेह सापडले. मात्र, ३ जणांचा शोध लागलाच नाही. यात महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. दरम्यान, धरण बाधित कुटुंबांच्या निवाऱ्यासाठी शेड उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्त्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, धरणग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाकडून त्वरील आर्थिक मदत मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. जी काही मदत केली, ती अपुरी आहे. तसेच येथील ग्रामस्थांच्या सोयी-सुविधांकडे देण्याचीही मागणी करण्यात येत आहे.
तिवरे धरण दुर्घटनेत २४ जण वाहून गेले होते. त्यांच्या शोधासाठी एडीआरएफकडून शोधमोहीम सुरु होती. दरम्यान, एक जण जिवंत सापडला. २३ जणांपैकी २० जणांचा शोध लागला. तब्बल १० दिवस शोध मोहीम सुरु होती. काल शुक्रवारी ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. तिवरे धरण फुटून अनेक घरे, गोठे वाहून गेले. तर पावसाचा जोर वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन शुक्रवारी दहाव्या दिवशी शोधमोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Maharashtra: Search operation at #TiwareDam in Ratnagiri, by NDRF, enters eighth day. So far 20 bodies have been recovered, 3 are still missing. pic.twitter.com/bpmQGX6St4
— ANI (@ANI) July 10, 2019
या शोध मोहिमेसाठी एनडीआरएफचे ६० जवान, दोन बोटी तिवरे येथे दाखल झाल्या होत्या. दोन बोटींच्या सहाय्याने मदतीने एनडीआरएफचे जवान दहा दिवसांत गावातील नदीसह वाशिष्ठीचे नदीपात्रात शोध मोहीस सुरु ठेवली होती. मात्र बेपत्ता दुर्वा चव्हाण (१.५) आणि सुशीला धाडवे यांचा शोध लागला नाही.
धरणग्रस्त कुटुंबीयांसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. सध्या चार घरांमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. धरणाच्या वरच्या बाजुला १५ कुटुंबांसाठी प्रत्येकी ३०० चौरस फुटाची शेड उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जनावरांसाठीही दोन शेड बांधण्यात येणार आहे.. या शेडजवळ जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेकडून आमदार उद्य सामंत यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्ष आदेश बांदेकर यांना लेखी पत्र देवून मदतीसाठी आवाहन केले आहे. तर राष्ट्रवादीकडून शेखर निकम यांच्या हस्ते प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. शासनाकडून ४ लाखांची मदत करण्यात आली आहे. तसेच आणखी मदत मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्यासाठीचे निवेदन सादर केले आहे.