तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं; जलसंधारण मंत्र्यांचा अजब दावा

काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडतात.

Updated: Jul 4, 2019, 11:36 PM IST
तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं; जलसंधारण मंत्र्यांचा अजब दावा title=

सोलापूर: चिपळूणमधील तिवरे धरण हे निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नव्हे तर खेकड्यांमुळे फुटले, असा अजब दावा राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. ते गुरुवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांनी सांगितल्यानुसार धरणाची दुरुस्ती केली होती. मात्र, याठिकाणी खेकड्यांचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने धरण फुटले, असे तानाजी सावंत यांनी म्हटले. 

यावेळी पत्रकारांनी त्यांना तिवरे धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते का, असा सवाल विचारला. त्यावर तानाजी सावंत यांनी म्हटले की, तिवरे धरण २००४ साली कार्यान्वित झाले. यानंतर १५ वर्षे सातत्याने धरणात पाणी साठत होते. हे धरण कोरडे पडले आणि त्याला तडे गेले, असा प्रकार एकदाही घडलेला नाही. गावकऱ्यांनी दाखवल्याप्रमाणे गळती होत असलेल्या ठिकाणांची डागडुजीही करण्यात आली होती. त्यामुळे धरण फुटण्यासाठी खेकड्यांचा मोठ्याप्रमाणवर झालेला प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. 

आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या या दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी होईल. धरणाचे स्वतंत्र ऑडिटही होईल. यामधून आणखी माहिती समोर येईलच. तसेच धरणाच्या परिसरात आठ तासांमध्ये १९२ मिलिमिटर पाऊस झाला. ही ढगफुटी असल्याची शक्यता गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. आठ तासांमध्ये पाण्याची पातळी आठ मीटरने वाढली. काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडतात. ते कुणाच्या हातात नसतं, असेही सावंत म्हणाले. दुरुस्तीचे काम निकृष्ट झाले होते का, असे विचारले असता जे काही शक्य होतं ते सगळं करण्यात आलं होतं, असा दावा सावंत यांनी केला.  

तिवरे धरणफुटीचा सर्वात मोठा तडाखा तिवरे गावातील भेंडेवाडीला बसला होता. या दुर्घटनेत २४ जण वाहून गेले होते. त्यातील १८ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत.