नगरमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, 2 कार आणि टेम्पोची धडक, एकाच कुटुंबातील तिघे ठार

Accident On Nagar Kalyan Road: छत्रपती संभाजीनगरनंतर अहमदमध्येही भीषण अपघात घडला आहे. तीन वाहनांचा अपघात झाला असून यात तीन जण ठार झाले आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 3, 2023, 12:52 PM IST
नगरमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, 2 कार आणि टेम्पोची धडक, एकाच कुटुंबातील तिघे ठार title=
Three killed and six injured in an accident near Nagar Kalyan Highway

लैलेश बारगजे, झी मीडिया

Accident In Ahmednagar: नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. (Accident News) या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहे. जखमीतील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. (Accident On Nagar Kalyan Road)

 नगर कल्याण महामार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास दोन कार आणि एक मालवाहतूक करणारा टेम्पो यांचा अपघात झाला आहे. या अपघातात ईरटीका कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्ती या मुंबईच्या कळंबोली भागातील असल्याची माहिती मिळत आहे.  कळंबोलीहून नगरच्या दिशेने ईरटीका कारमधून प्रवास करणाऱ्या भावसार कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. 

प्रीती भावसार, वेदांत भावसार आणि कारचालक रोशन या तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका विचित्र होता की मालवाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला असून दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि जखमींना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीचा अपघात

वैजापूर शहरातील जीवनगंगा गेटसमोर भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार ५० ते ६० फुट वर उडून खाली कोसळला. तर अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची मोटरसायकल १०० फुट फरफटत गेली आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या अपघाताची भीषण दृष्ये पाहून अंगाचा थरकाप उडाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

धाराशिवमध्ये बसचा अपघात

धाराशिव जिल्ह्यातील परंडा बार्शी रस्त्यावर सोनगिरी पुलाजवळ एसटी बसचा अपघात झाला आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात सत्तावीस प्रवासी जखमी झाले असून यापैकी चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना परंडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांना बार्शी येथील खाजगी दवाखान्यामध्ये रेफर करण्यात आले आहे. परांडा डेपोची बस सकाळी साडे आठच्या सुमारास परांड्याहून बार्शीला जात होती. सोनगिरी पुलाच्या जवळ वळण घेताना ही बस पलटी झाली. सोनगिरी पुलाच्या वळणाजवळ पाठीमागून अचानक एक वाहन आल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस वळणावर पलटी झाली आहे.