'या' कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू नसणार, जाणून घ्या

पाच दिवसांचा आठवडा लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही निश्चित 

Updated: Feb 25, 2020, 11:06 AM IST
'या' कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू नसणार, जाणून घ्या title=

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने जाहीर केल्यानंतर आता त्याच्या नियमांचा जीआर २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे. त्यात पाच दिवसांचा आठवडा कोणास लागू नसेल हे तर स्पष्ट केलेले आहेच, शिवाय पाच दिवसांचा आठवडा लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही निश्चित करण्यात आली आहे.

२९ फेब्रुवारी, २०२० पासून शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत असून त्यामुळे सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असणार आहे. 

सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवण्यात येत असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहणार वेळ असणार आहे.

सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते सायांकाळी ६.३० अशी असणार आहे. 

दुपारी १.०० ते २.०० या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. 

ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालय आणि शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार इ. यांना पाच दिवसांच्या आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत.