पाकिस्तानमध्ये अत्याचार नाही तेवढे... भाजप आमदाराची कुणावर टीका?

कृषी पंपाची वीज कापण्यात आलीय. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलीय. कृषी पंपाची वीज जोडणी करावी ही या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. 

Updated: Feb 17, 2022, 03:18 PM IST
पाकिस्तानमध्ये अत्याचार नाही तेवढे... भाजप आमदाराची कुणावर टीका?  title=

मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज कापण्यात आली. शेतकरी आक्रमक झाले आहेत. चार दिवस झाले तरी कुणाचं लक्ष नाहीय. पाकिस्तानमध्येही एवढे अत्याचार झाले नसतील, अशी टीका भाजप आमदार समीर कुणावार यांनी केलीय. 

वर्धा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कापण्यात आलीय. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलीय. कृषी पंपाची वीज जोडणी करावी ही या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. 

गेले चार दिवस हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करून शेतकऱ्यांच्या समस्येकडे महावितरणचे लक्ष वेधण्यात येत आहे. 

या आंदोलनात आतापर्यंत 125 सरपंचासह अनेक शेतकरी सहभागी झालेत. महावितरणच्या तुघलकी कारभारामुळे हे शेतकरी आक्रमक झाले आहेत. आंदोलन सुरु होऊन चार दिवस झाले तरी प्रशासनाकडून कोणीही भेटायला आले नाही. पालकमंत्री झोपलेले आहेत अशी टीका आमदार कुणावार यांनी केली. 

पाकिस्तानमध्ये जेवढे अत्याचार होत नाहीत तेवढे अत्याचार वर्ध्यात जिल्ह्यात महावितरण करत आहे. महावितरणकडून नंगानाच सुरू आहे. चार दिवस होऊनही प्रशासनाचा एकही अधिकारी भेटायला आला नाही. ही माझी गत आहे तर बाकीच्यांची काय? अशी संतप्त प्रतिक्रियायी आमदारांनी दिलीय. तसेच, हे आंदोलन आक्रमक झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.