महाराष्ट्रातील सर्वात लहान मावळा; दीड वर्षाच्या रायबाने सर केला शिवनेरी किल्ला

Maharashtra Tourism : दीड वर्षाच्या रायबाने शिवनेरी किल्ला सर केला आहे. नाशिकच्या उमराण्याच्या चिमुकल्याच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

Updated: Feb 18, 2024, 04:57 PM IST
 महाराष्ट्रातील सर्वात लहान मावळा; दीड वर्षाच्या रायबाने सर केला शिवनेरी किल्ला title=

Shivneri Fort : शिवनेरी किल्ला हा  (Shivneri Fort) छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. एकदा तरी एकदा या किल्ल्या भेट द्यायची अशी अनेक ट्रेकरटी इच्छा असते.  गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा हा किल्ला समुद्र सपाटी पासून  3500 फूट उंचीवर आहे. नाशिक मधील दीव वर्षाच्या रायबाने शिवनेरी किल्ला सर केला आहे. रायबा हा महाराष्ट्रातील सर्वात लहान मावळा ठरला आहे. 

किल्ले सर करणारे अनेक गिर्यारोहक आपण पाहिले असतील. मात्र, नाशिकच्या उमराणे येथील शिवार्थ देवरे उर्फ रायबा सर्वात लहान गिर्यारोहक ठरला आहे. फक्त दीड वर्ष म्हणजेच अवघ्या 16  महिन्यांच्या असलेल्या रायबाने शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ला सर केला. शिवनेरी पायी सर करणारा रायबा हा सर्वात लहान मावळा ठरला आहे.

शिवराज्यभिषेक दिनी जन्मलेला शिवार्थराजेला लहानपणापासूनच शिवरायांबाबत विशेष प्रेम आहे. रायबाचे छत्रपतींविषयी असलेली विशेष ओढ लक्षात घेता त्याचे वडील सचिन देवरे आणि आई स्नेहल देवरे यांनी रायबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचा मानस केला. यासाठी त्यांनी सर्व कागदोपत्री परवानगीची पुर्तता केली. काही डॉक्टरांना सोबत घेतले. तसेच काही दिवस रायबाचा चालण्याचा सराव करुन घेतला. 

आई, वडील डॉक्टर व काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत रायबाने तब्बल 6 तास 27 मिनीटात चिमुकल्या रायबाने शिवनेरीची मोहीम फत्ते केली. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला महलही उघडून दिला. रायबाने देखील मोठ्या अदबीने प्रवेश करीत शिवरायांच्या जन्मस्थळाला मानाचा मुजरा केला. तर, परतीचा प्रवास एक तास 37 मिनीटात रायबाने पूर्ण केला.आजच्या स्मार्ट युगात लहान मुले स्मार्ट फोनशी खेळतात. मात्र, रायबा छत्रपतींची प्रतिमा, मूर्तीमध्ये रमतो. रायबाने केलेल्या कामागिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिवाजी महाराजांची जन्मभूमी 

पुण्यापासून जवळपास 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नरमध्ये शिवनेरी हा किल्ला आहे. 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवजन्मामुळे पावन झालेला शिवनेरी हा शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक देखील आहे. हे स्मारक शिवकुंज म्हणून ओळखले जाते. येथे शिवाजी महाराजांसोबत जिजामाता यांची देखील मूर्ती आहे. या किल्ल्यात पाळणा देखील आहे. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी 7 प्रमुख दरवाजे पार करावे लागतात.