Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सर्वच विभागांमध्ये हस्तक्षेप वाढल्याने शिंदे गटांतील मंत्र्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलीय. महायुतीत नंतर येऊन अजित पवार शिरजोर होत असल्याची भावना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांमध्ये आहे. केवळ शिंदे गटच अजितदादांमुळे बेजार नसून भाजपातही नाराजी वाढत चाललीय. भाजपच्या काही मंत्र्यांनी तर थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांकडेच नाजारी व्यक्त केली आहे. शिंदे गट अजित पवारांविरोधात नेमकी काय भूमिका घेणार आणि यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मार्ग काढणार का याकडे लक्ष लागले आहे.
1 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकार सोबत सत्तेत सहभागी झाला. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले. तर, त्यांच्यासह आलेल्या आमदारांना देखील मंत्रीपद दिले. अजित पवार गटाला थेट मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने मंत्री पदाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिंदे गटासह भाजप मंत्री देखील आवाक झाले. उपमुख्यमंत्री पदाची सुत्र हातात मिळताच अजित पवार अधिक आक्रमकपणे काम करताना दिसत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सर्वच विभागांमध्ये हस्तक्षेप वाढल्याने शिंदे गटांतील मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकारी मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसंच पुण्यात प्रशासकीय बैठका घेत असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही नाराज आहेत. भाजपच्या काही मंत्र्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर नाराजी घातल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी निधी वाटपावरुन देखील शिंदे गटासह भाजपच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'वर्षा' निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला उपमुख्यमंत्री अजित पवार फिरकले नाहीत. त्यामुळं पुन्हा एकदा अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरू झालीय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन अजित पवारांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. मात्र वर्षावर मात्र जाणं टाळलं. राष्ट्रवादीचे काही मंत्री वर्षावर गेले, मात्र अजित पवार का गेले नाही, अशी चर्चा आता रंगलीय. अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्या मुंबई दौ-यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची गैरहजेरी अनेकांना खटकली.
राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवारांनी आचारसंहिताच घालून दिलीय. कारण राष्ट्रवादीच्या आमदारांनी परस्पर मंत्र्यांना बैठका लावण्यास सांगू नये अशी सूचना अजित पवारांनी केलीय. तसंच वादग्रस्त विधानं करुन पक्षाची कोंडी न करण्याच्या सूचनाही अजित पवारांनी केल्यात. भाजप आणि शिंदे गटाकडे असणा-या मंत्र्यांच्या विभागाचं काम अजित पवारांच्या माध्यमातून केलं जाईल. कामाचा फॉलोअपही अजित पवारच घेमार आहेत. तसंच महामंडळ वाटपावर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि धनंजय मुंडे समन्वय करणार आहेत.. तसंच आमदार विकास निधीच्या कामाच्या फॉलोअपसाठी अजित पवार एका ओएसडीची नियुक्ती करणार आहेत.