कोरोनाचा धोका वाढतोय; रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. रमण गंगाखेडकर टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. औषधं, रुग्णालयांचा आढावा घेतला जाणार आहे.

Updated: Dec 27, 2023, 10:42 PM IST
कोरोनाचा धोका वाढतोय; रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना title=

Covid-19 JN1 : पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे देशात 100 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना टास्क फोर्स पुन्हा स्थापन करण्यात आला आहे. डॉ. रमण गंगाखेडकर या टास्कफोर्सचे प्रमुख असणार आहेत. कोरोनासाठी लागणारी औषध, रुग्णालय, ऑक्सिजन व्यवस्था या सगळ्यांचा टास्क फोर्स आढावा घेणार आहे. रुग्णांवर उपचार करताना समान औषधांचा प्रोटोकॉलही टास्क फोर्स निश्चित करणार आहे. 

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN 1 चे 10 रुग्ण झालेत. बुधवारी राज्यात 37 नवीन रुग्णांचं निदान झालं. तर, राज्यात दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. JN1 व्हेरियंटचे 10 रुग्ण सापडले आहेत. ठाण्यात 5, पुण्यात 3, सिंधुदुर्गात 1 तर अकोल्यात नव्या व्हेरियंटचा एक रुग्ण सापडला आहे. 

नांदेडमध्ये दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सौम्य लक्षणे असल्याने दोन्ही रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलंय. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा जूना व्हेरियंट आहे की नवा हे तपासण्यासाठी जिमोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवलं जाणार आहे.  नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये दोन कोरोना संशयित आढळलेत. त्यांच्या RTPCR चाचण्या करण्यात आल्यात. त्यांचा अहवाल प्रतीक्षेत असून खबरदारीचा उपाय म्हणून 60 जणांच्या तपासण्या करण्यात आल्यात. 

कोरोनानं पुन्हा सर्वांची चिंता वाढवली

कोरोनानं पुन्हा सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोनाचा नवा व्हॅरियंट JN.1 ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 100 पार गेली आहे. देशात 26 डिसेंबरपर्यंत 109 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी सर्वाधिक 36 रुग्ण गुजरातमधले आहेत तर कर्नाटकात 34 रुग्ण आहेत. महाराष्ट्रात JN.1चे 10 रुग्ण झालेत. दरम्यान गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळून आले असून तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

यात कर्नाटकमधील दोघांचा तर गुजरातमधील एका रुग्णाचा समावेश आहे.. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णांसह देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता चार हजारांहून अधिक झालीये. सुट्ट्या आणि नव्या वर्षाचं सेलिब्रेशन यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखीन वाढलीये. 

दर्शन रांगेतल्या भक्तांना मास्क घातल्याशिवाय साईदर्शन नाही

शिर्डीच्या साईमंदिरात लवकरच मास्क सक्ती लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. दर्शन रांगेतल्या भक्तांना मास्क घातल्याशिवाय साईदर्शन घेता येणार नाही. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थानला तशा सूचना दिल्या आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या जेएन-१ व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरादीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहे. विशेष म्हणजे दर्शन रांगेतल्या भक्तांना संस्थानकडून मास्क पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.