अहमदनगर : शहीद जवान अनिल गोरे अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय.. वंदे मातरम.. या घोषणांनी राजुरी गावचे वातावरण देशभक्तीमय झाले. जम्मू काश्मीरमधील लडाख येथे राजुरी, ता. राहाता येथील अनिल विष्णू गोरे हे जवान शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी राजुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सपना, मुलगी अंकिता, आई रंजना, वडील विष्णू आणि भाऊ सुनील गोरे, वहिनी शितल असा परिवार आहे. शहीद जवान अनिल गोरे यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले. पुणे येथून वाहनाने त्यांच्या मूळ गावी आणून गावातून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. संपूर्ण गाव यावेळी शोकाकूल झाले होते. गावकऱ्यांनी भावूक वातावरणात साश्रूनयनांनी शहीद अनिल गोरे यांना अखेरचा निरोप दिला. राजुरी येथील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल आर. आर. जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली आणि शहीद अनिल गोरे यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले तसेच तातडीच्या आर्थिक मदतीचा धनादेश कुटुंबीयांना सुपूर्द केला.
शहीद जवान यांना सैनिक दलातील तुकडीने हवेत बंदूकीने तीन फैरी झाडून आदरांजली वाहीली. अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी, पोलीस दलाचे अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.