राज्यातील 'या' शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली, मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू

 राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे

Updated: Feb 18, 2021, 08:49 AM IST
राज्यातील 'या' शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली, मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू  title=

मुंबई : राज्यात रूग्णसंख्येत पुन्हा कमालीची वाढ व्हायला लागलीय. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे गेलाय. जानेवारीत कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये कपात झाली होती. रेट 5 टक्क्यांवर आला होता. त्यामुळे राज्यात अनेक सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. 

मात्र आता पुन्हा रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रूग्णवाढीचा दर 5 टक्के होता. मात्र गेल्या आठवड्यात तो अचानक दुप्पट झालाय. 

फेब्रुवारीच्या १५ आणि १६ तारखेला राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ९ टक्क्यांवर गेलाय. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णवाढीचा दर झपाट्याने वाढतोय. 

अमरावतीत ५६ टक्के, भंडाऱ्यात २६ टक्के, अकोल्यात २२ टक्के तर बुलडाण्यात २६.५ टक्के दर नोंदवण्यात आलाय. कोकणात सिंधुदुर्गातही रूग्णवाढीचा दर ४४ टक्क्यांवर पोहोचलाय. 

कोरोना पॉझिटीव्ह रेटमध्ये वर्धा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेयत. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र न येण्याचे आदेश दिले गेलेयत. औषधी दुकाने वगळता सर्व बाजारपेठ आजपासून संध्याकाळी ७ पर्यंत राहणार सुरू राहणार आहेत. तसेच लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींचं बंधन असणार आहे.

वाशिम जिल्ह्यात आजपासून जमावबंदी लागू करण्यात आलीय. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आलीय. सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आजपासून बंद करण्यात आलेत. सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलाय. लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आलीय.  मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आलाय.