स्वाती नाईक, झी मिडिया, नवी मुंबई : आरोपींना शिक्षा देण्याचे आणि न्यायदानाचे काम कोर्टात केले जाते. नवी मुंबईतील(Navi Mumbai ) बेलापूर कोर्टात(Belapur Court) एक विचित्र घटना घडली आहे. कामकाजानिमित्ताने कोर्टात आलेल्या नागरीकांना कोर्टाच्या लिफ्टमध्येच शिक्षा भोगावी लागली. चालू लिफ्ट अचानक बंद पडल्याने नागरीक बराचवेळ यात अडकून पडले होते.
नवी मुंबईच्या बेलापूर न्यायालयात नेहमीच नागरीकांची मोठी वर्दळ असते. दररोज शेकडो नागरीक कामा निमित्ताने कोर्टात येतात. अनेक आरोपींना देखील याच कोर्टात हजर केले जाते. न्यायालयाच्या इमारतीमधील लिफ्ट मोठी अडचण ठरत आहेत.
येथील लिफ्ट नादुरुस्त असल्याने ती वारंवर बंद पडते. लिफ्ट अचानक मध्येच बंद पडल्याने अनेक नागरीक लिफ्टमध्ये अडकले. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
लिफ्ट बंद पडली तेव्हा अनेकजण लिफ्टमध्ये होते. लिफ्टचा दरवाजा उघडत नसल्याने नागरीक गोंधळले, भयभित झाले. बराचवेळ लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. अखेरीस दरवाजा अर्धवट उघडून नागरिकांना खेचून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही.
न्यायालयाच्या दोन्ही लिफ्ट नादुरुस्त आहेत. 15 पेक्षा अधिक वेळ या लिफ्ट बंद पडून त्यात नागरिक अडकल्याचे प्रकार घडले आहेत. या लिफ्ट दुरुस्ती करण्याची मागणी वकील संघटनांनी कोर्टाकडे तसंच बांधकाम विभागाकडे केली आहे. वारंवार तक्रार करून देखील दुरुस्ती केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.