Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता निकालाचा मुहूर्त ठरलाय, अशी माहिती सुत्रांनी दिलीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचं समजतंय. 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.. त्यामुळे 48 तासात शिवसेना आमदार अपात्रतेचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेमकी कुणाची हे आधी ठरवणार. विधानसभा अध्यक्ष शिवसेनेच्या घटनेचा आधार घेऊ शकतात. शिवसेना पक्षप्रमुख हे पदच वैध नसल्याचा आधार घेतल्यास ठाकरे गट आमदार अपात्र ठरू शकतात. पक्षप्रमुख हे पद वैध ठरल्यास शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रता कारवाई होवू शकते. पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन सिद्ध झाल्यास शिंदे गटाचे आमदार अपात्र होऊ शकतात. शिवसेनेत फूट पडली नाही, हा युक्तिवाद ग्राह्य धरल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होवू शकते. विधीमंडळ पक्षाचे महत्त्व लक्षात घेता विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. आमदारांनी बैठक घेऊन ठाकरेंकडचे अधिकार शिंदेंना दिल्याच्या मुद्द्यावर सुनावणी या युक्तिवादाच्या आधारे शिंदे गटावर कारवाईची शक्यता धूसर आहे.
एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य आहे. शिंदेंसह 16 आमदार पात्र की अपात्र हे पुढच्या 48 तासात स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरणार का, ते अपात्र ठरले तर राज्य सरकारचं काय होणार? की यापेक्षा वेगळा निकाल लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय. खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आपलीच आहे, असं शिंदेंनी म्हटलंय. शिवसंकल्प अभियानाचा कार्यक्रम आज रत्नागिरीतल्या राजापुरात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.