Temple Dress Code : महाराष्ट्रात विविध मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यासंबंधी हालचाली सुरु आहेत. त्यातच आता नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश (tekadi ganesh nagpur) मंदिरातही आता ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून वस्त्र संहिता जारी करण्यात आलीये. त्याला राज्यभरातील मंदिरांकडून प्रतिसाद मिळत आहे. नागपुरात सुरुवातीला 4 मंदिरांनी ड्रेसकोड लागू केला. आता यामध्ये नागपुरातील टेकडी गणेश मंदिरही सहभागी झाले आहे.
नाशिकमधील सप्तशृंगी मंदिरासोबतच आता काळाराम संस्थानही ड्रेसकोड लागू करण्याची शक्यता आहे. उघडपणे मंदिर विश्वस्त काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र, मंदिर महासंघाच्या निर्देशानंतर हा नियम वादग्रस्त न ठेवता कसा लागू करता येईल, यावर खल सुरू आहे.
सप्तशृंगी गडावर ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे. कारण वणी ग्रामस्थांनी ड्रेसकोडचा ठराव मंजूर केला आहे. महिलांनी पूर्ण कपड्यांमध्येच दर्शनाला यावं असा ठराव मंजूर झाला आहे. ड्रेस कोडच्या ठरावाची प्रत आज सप्तशृंगी संस्थांनला देण्यात आली. आता संस्थान यावर काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.
आई तुळजाभवानीच्या मंदिरात ड्रेसकोडचा वाद सुरु झाला. यानंतर सप्तशृंगी गडावरही ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खुद्द वणी ग्रामस्थांनीच ड्रेसकोडचा ठराव मंजूर केला. महिलांनी पूर्ण कपड्यांमध्येच दर्शनाला यावं, पुरुषांनी भारतीय पेहराव करावा असा ठराव करण्यात आलाय. ड्रेस कोडच्या ठरावाची प्रत सप्तशृंगी देवस्थानाला देण्यात आली.
इतर मंदिरांमध्ये व्यवस्थापनानं ड्रेसकोड लागू केला होता. इथं स्वत: वणी गावचे ग्रामस्थ ड्रेसकोडसाठी आग्रही आहेत. तर ड्रेसकोडबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं संस्थानच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले.
तर राज्यातील मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याच्या भूमिकेला भाजपनंही पाठिंबा दिला आहे. मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. तिथं गरीब-श्रीमंत, जात-धर्म असा भेदभाव केला जात नाही. कपड्यांचं म्हणाल तर बोटावर मोजण्याइतपत अपवाद वगळले तर कोणते कपडे घालावेत आणि कोणते घालू नयेत याचं भान ज्याचं त्याला असतंच. त्यामुळं असे निर्बंध लादण्याची आणि ड्रेसकोड लागू करण्याची खरचं गरज आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.