सांगलीत जवानांची बोट उलटली, 'एनडीआरएफ'ची तत्काळ मदत

उल्लेखनीय म्हणजे, गुरुवारी अशीच बोट उलटून एक दुर्घटना घडली होती

Updated: Aug 9, 2019, 10:11 PM IST
सांगलीत जवानांची बोट उलटली, 'एनडीआरएफ'ची तत्काळ मदत  title=

रविंद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : सांगलीतल्या पुरात आज आणखी एक दुर्घटना घडता घडता वाचलीय. सांगलीत बचावकार्य करणारी एक बोट उलटून ही दुर्घटना घडली. या बोटीतून ७-८ सामान्य नागरिक आणि काही बचाव कार्यातील जवान प्रवास करत होते. बोट उलटल्यानंतर बोटीतील जवान आणि सामान्य नागरिक पाण्यात बुडाले. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून हे सगळे प्रवासी बचावले आहेत. परंतु, जवळूनच जात असलेल्या एनडीआरएफच्या बोटीतील जवानांच्या ही गोष्ट ध्यानात आली... आणि त्यांनी तातडीनं पाण्यात उड्या घेत बुडणाऱ्यांचे प्राण वाचवले. 

बोटीतून प्रवास करणारे नागरिक गंगाधरनगरचे रहिवासी होते. सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळतेय. सांगलीहून कोल्हापूरला जाणाऱ्या रोडवरच्या १०० फूट कॉर्नरच्या चौकात ही घटना घडली.

नागरिकांना वाचवण्यासाठी जवान इथं दाखल झाले होते. परंतु, पाण्याच्या प्रचंड प्रवाहात ही बोट उलटली आणि जवानांसहीत बोटीतील नागरिकही पाण्यात बुडाले. पण दैव बलवत्तर म्हणून जवळूनच जाणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांची तातडीनं मदत त्यांना मिळाली. पाण्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर नागरिकांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  

उल्लेखनीय म्हणजे, गुरुवारी अशीच बोट उलटून एक दुर्घटना घडली होती. ब्रह्मनाळपासून खटावकडे निघालेली बोट इच्छित स्थळी पोहचण्याअगोदरच पुराच्या पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले तर बोटीतल्या १५ जणांना वाचवण्यात यश आलं होतं.
 
दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदत कार्यासाठी पुणे महसूल विभागातील सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या १० ऑगस्ट, ११ ऑगस्ट आणि १२ ऑगस्ट रोजीच्या शासकीय सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात.