BMC च्या दस्तावेजांवर उमटते लाख मोलाची मोहोर! ब्रिटिशकालीन 150 वर्षांपूर्वीचे 'सील' यंत्र आजही कार्यरत

बृहन्मुंबई महानगरपालिका सचिव विभागातील ब्रिटिशकालीन दीडशे वर्षांपूर्वीचे 'सील' यंत्र आजही कार्यरत आहे. अनेक ऐतिहासिक कागदपत्रांवर दीडशे वर्षांपासून शिक्कामोर्तब करण्यात येत आहे. दरवर्षी दसऱ्यानिमित्त केली जाते या यंत्राचे पूजन करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते.

Updated: Oct 23, 2023, 10:03 PM IST
BMC च्या दस्तावेजांवर  उमटते लाख मोलाची मोहोर! ब्रिटिशकालीन 150 वर्षांपूर्वीचे 'सील' यंत्र आजही कार्यरत title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचे आर्थिक बजेट असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभारही तितकाच मोठा आणि अवाढव्य आहे. येथील प्रत्येक विकासकामे, त्यांच्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदा, कागदोपत्री कामकाजही जबाबदारीचे आहे. मात्र या सर्व निविदा, कागदपत्रे यांच्यावर जोपर्यंत एक खास ‘मोहोर’ उमटत नाही तोपर्यंत सदर कंत्राट अंतिम (Final) होत नाही. ही खास मोहोर उमटविली जाते एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण यंत्राने !  तब्बल दीडशे वर्ष वय असलेल्या ऐतिहासिक यंत्राने उमटविण्यात येणारा शिक्का आजही तेवढाच ठसठशीत आहे. महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निविदेवर, महत्त्वाच्या कागदपत्रांवर याच यंत्राद्वारे मोहोर उमटविली जाते. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या प्रत्येक कंत्राटाची अंतिम रक्कम अदा करण्यापूर्वी त्यावर या यंत्राद्वारे मोहोर उमटविणे आवश्यक आहे. दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने निमित्ताने या यंत्राचे पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशी माहिती महानगरपालिका सचिव (प्र.) श्रीमती संगीता शर्मा यांनी दिली आहे.
..
बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत संपूर्ण भारतीयांसाठी आजही एक आकर्षण आहे. या इमारतीची बांधणी ब्रिटिशकालीन आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून या इमारतीचे सौंदर्य अबाधित असून, येथे अनेक आश्चर्यकारक आणि कुतूहल वाढविणाऱ्या बाबींचा समावेश आहे. तसेच ही महानगरपालिका आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा भारतातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा मोठा आहे. याद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आतापर्यंतचे महापौर आणि आयुक्त यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. 
..
मुंबईकरांचे रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, सुरक्षा, रस्ते आरोग्य आदी विविध नागरी सेवा सुविधांसह अनेक पायाभूत सुविधांबाबत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या सेवेत आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासनाला अनेकदा लोकाभिमुख निर्णय घ्यावे लागतात, त्यांची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे साहजिकच महानगरपालिका प्रशासनाच्या विविध कागदपत्रांना खूप महत्त्व असते. त्यामुळे या कामगदत्रांवरील लिखाण, त्यावरील शेरे, शिक्के यांनाही खूप अर्थ असतो.  

बृहन्मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासूनचे महत्त्वाचे दस्तावेज आजही महानगरपालिकेच्या सचिव विभागाने जपून ठेवले आहेत. यामध्ये सन १८७३ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या इतिवृत्तापासून अनेक महत्त्वाच्या दस्तावेजांचा समावेश आहे. सचिव कार्यालयातील जुन्या कपाटांमध्ये हा अमूल्या ठेवा गेल्या दीडशे वर्षांपासून जपून ठेवण्यात आला आहे. या मौल्यवान ठेव्यातील अनेक कागदपत्रांवर एक मोहोर उमटलेली आपल्याला दिसते. गेल्या दीडशे वर्षांपासून ही मोहोर ज्या 'सील' यंत्राद्वारे उमटवली जाते, ते यंत्र सन १८७४ मध्ये लंडन येथे तयार केलेले आहे. हे यंत्र अतिशय भक्कम आणि पूर्णपणे लोखंडी बनावटीचे असून, त्याद्वारे महत्त्वाच्या कागदपत्रांवर मोहोर उमटविली जाते. विशेष बाब म्हणजे जोपर्यंत ही मोहोर उमटत नाही, तोपर्यंत या कागदांना काहीच अर्थ नसतो. या यंत्राचे अनेकांना अप्रुप असून, महानगरपालिका सचिव (चिटणीस) विभागात हे यंत्र गेली तब्बल दीडशे वर्ष अव्याहतपणे कार्यरत आहे.

अशी उमटते बृहन्मुंबई महानगरपालिकेची मोहोर !

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सचिव (चिटणीस) कार्यालयातील 'सील' यंत्र ब्रिटिशकालीन असून, त्याची बनावटही पुरातन आहे. लोखंडापासून तयार केलेले हे यंत्र एका मोठ्या लाकडी टेबलावर बसविण्यात आले आहे. हे यंत्र वापरताना सुरुवातीला एका मोठ्या लोखंडी तुळईचा वापर करण्यात येतो. या तुळईच्या दोन्ही बाजूला लोखंडाचे दोन मोठे गोळे जोडलेले आहेत. अत्यंत वजनदार असणारी ही तुळई यंत्राच्या वरती ठेवण्यात येते. त्यानंतर या यंत्राच्या खालच्या भागात असलेल्या छोट्याच्या लोखंडी फटीत ज्यावर मोहर उमटवायची आहे ते महत्त्वाचे कागद ठेवले जातात. त्यानंतर यंत्राच्या वर ठेवण्यात आलेली वजनदार लोखंडी तुळई उजवीकडून डावीकडे फिरविली की, लोखंडी फटीचे दोन्ही लोखंडी भाग एकमेकांवर दाबले जातात आणि कागदावर ठसठशीत मोहोर उमटते !

गेल्या दीडशे वर्षांपासून हे यंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत अविरतपणे कार्यरत असून, त्याद्वारे अनेक महत्त्वाच्या ऐवजांवर ‘शिक्कामोर्तब’ करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रथेनुसार या यंत्राचे दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशीही माहिती या निमित्ताने संगीता शर्मा यांनी दिली आहे.